मुंबई ः नरेश कदम
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसला सोबत घेण्याचे उद्धव ठाकरे यांचे शर्थीचे प्रयत्न फसले आहेत. त्यामुळे लोकसभेसह 2024 च्या विधानसभेची निवडणूक लढविणारे उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस आमने सामने येणार आहे.
काँग्रेससोबतची आघाडी ही मुंबईपुरती तुटली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची आघाडी मुंबईत यशस्वी ठरली होती. मात्र मुस्लिम आणि दलित मतदारांचे प्राबल्य असलेले लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ उद्धव ठाकरे गटाने काँग्रेसकडून खेचून घेतले आणि ते जिंकलेही. त्यामुळे मुंबई काँग्रेसच्या नेत्यांनी सुरुवातीपासून मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा हट्ट काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे धरला. आणि मुंबईतील हे गड आपल्या हातून जातील, असे आकडेवारीसह पक्षश्रेष्ठींना समजावून सांगितले. भाजप हा आपला नंबर एकचा शत्रू असला तरी आपला जनाधार उद्धव ठाकरे यांच्याकडे जाईल, अशी काँग्रेसची भूमिका आहे.
दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी मराठी मतांचे विभाजन होऊ नये , यासाठी राज ठाकरे यांच्या मनसेशी युती केली. पण मनसे हा काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या आघाडीतील अडसर आहे. पण त्याचबरोबर काँग्रेस स्वबळावर लढली तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मुस्लिम आणि दलित मतांचे विभाजन होईल ही उद्धव ठाकरे यांना भीती वाटत आहे.
समोर भाजप महायुतीकडे गुजराती, राजस्थानी आणि उत्तर भारतीय मते आहेत. त्या तुलनेत उद्धव आणि राज यांच्या युतीला मराठी मतांबरोबर मुस्लिम आणि दलित मतांची साथ मिळाली तर ही युती 100 चा पल्ला गाठू शकते..त्यामुळे उद्धव ठाकरे हे राहुल गांधी यांच्याशी बोलले, पण मुंबईपुरती अडचण आहे, असे उत्तर त्यांनी उद्धव यांना दिले. त्यामुळे हे दोन्ही पक्ष वेगळे लढतील.
सेनेसोबतची आघाडी काँग्रेसला तात्पुरते यश देते मात्र काँग्रेसचे दीर्घकालीन नुकसान करते.गेल्या लोकसभा आणि विधानसभेला थोडेबहुत यश या आघाडीतून काँग्रेसला मिळाले मात्र काँग्रेसचा जनाधार तुटण्याची शक्यता त्यातून निर्माण झाली. म्हणूनच पक्ष वाचवायचा तर स्वबळावर लढावे लागेल हा मुंबई प्रदेश काँग्रेसचा आग्रह काँग्रेस श्रेष्ठींनी मान्य केल्याचे सांगितले जाते.
स्वातंत्र्यापासून ते 1968 पर्यंत 21 महापौर काँग्रेसचेच झाले. त्यातले 15 अमराठी होते. 1968मध्ये मात्र 140 पैकी सर्वाधिक 65 जागा जिंकूनही काँग्रेसला मध्येच महापौरपद सोडावे लागले आणि शिवसेनेचे डॉ. भीमचंद गुप्ते महापौर झाले. 1972 लाही 45 जागा जिंकूनही काँग्रेसला महापौरपद काही मिळाले नाही. काँग्रेसने मुंबई पालिकेत शेवटचा विजय 1992 साली मिळवला. 112 जागा जिंकल्या. त्यानंतर काँग्रेसने मुंबईत हा विजय पाहिला नाही.