मुंबई : मुंबई महापालिकेत 25 वर्षे सत्तेत राहूनही ठाकरेंना केलेले एकही काम दाखविता येत नाही. आता जाहीरनामा काढून मुंबईकरांनी जी आश्वासने देत आहेत,ती कामे 25 वर्षांत का केली नाहीत, असा प्रश्न मुंबई भाजपाध्यक्ष अमित साटम यांनी केला. पालिकेतील सत्ताकाळात उद्धव ठाकरेंनी तीन लाख कोटींचा घोटाळा केल्याचा खळबळजनक आरोपही साटम यांनी केला.
मुंबई महापालिका निवडणुकांसाठी शिवसेना ठाकरे आणि मनसेने रविवारी संयुक्त वचननामा जाहीर केला. त्यानंतर पत्रकार परिषद घेत भाजपने ठाकरेंवर आरोप केले. यावेळी बोलताना मुंबई भाजपाध्यक्ष अमित साटम म्हणाले की, मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील 1700 बार रेस्टॉरंटकडून वसुली केली. रस्ते, कचरा, कोविड सेंटर, टॅब खरेदी, नाफेसफाई आदी मुंबई महानगरपालिकेच्या कामांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने तब्बल साडेतीन लाख कोटी रुपयांवर डल्ला मारला आहे.
हा देशातील सर्वांत मोठा भ्रष्टाचार आहे. त्यामुळे मुंबईकर यावेळी त्यांना घरी बसवेल, असे अमित साटम म्हणाले. गेल्या दहा वर्षांमध्ये 21 हजार कोटी रुपये खर्च करून रस्त्याची अवस्था बिकट आहे. हे उद्धव ठाकरे यांच्यामुळेच झाले आहे. कोरोना काळात महालक्ष्मी येथील कोविड सेंटर हे बिल्डरच्या भल्यासाठीच उभारण्यात आले होते. बॉडी बॅग, पीपीई कीट असे काहीही त्यांनी सोडले नाही, असा आरोपही साटम यांनी केला.
उद्धव ठाकरे यांनी आपल्या पत्रकार परिषदेत अमित साटम यांच्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर कोण चाटम, म्हणत झिडकारले होते. त्यावर, उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली. त्यांनी प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली आहे. त्यांनी मराठी माणसाचा अपमान केला आहे. मी सामान्य कुटुंबातून आलेलो आहे. कोणाच्या आशीर्वादाने आलो नाही, असा टोला साटम यांनी लगावला.
मुंबई महापालिकेत ज्या कालावधीत उद्धव ठाकरेंनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत आहेत,त्या काळात भाजपही सत्तेत सहभागी होती, या प्रश्नावर भाजपच्या नगरसेवकांची संख्या सांगत आम्ही त्या सत्तेतला अत्यंत लहान घटक होतो,असे उत्तर साटम यांनी दिले. तर, दीर्घकाळ ठाकरेंच्या पक्षाकडून स्थायी समितीवर असलेले राहुल शेवाळे आता महायुतीत आहेत. याकडे लक्ष वेधले असता, शेवाळे स्थायी समितीवर असले तरी सत्तेच्या चाव्या उद्धव ठाकरेंकडेच होत्या, असा दावा साटम यांनी केला.