मुंबई : नरेश कदम
आगामी स्थानिक स्वराज्य युती संस्थांच्या निवडणुकीत करण्यासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात कधी उघडपणे तर कधी गुप्तपणे बैठका होत असून जागावाटपांवर चर्चा सुरू आहे. आधी जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवू आणि नंतरच ठाकरे गट आणि मनसेच्या युतीची घोषणा करण्याची ठाकरे बंधूंची रणनीती आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची युती करण्याचे निश्चित झाले आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात मनसेसोबत युतीची घोषणा होणार असल्याचे ठाकरे गटात बोलले जात होते. पण युतीची घोषणा करण्यापूर्वी जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करूया, असे ठाकरे बंधूंनी ठरविले आहे.
याबाबत उघडपणे राज आणि उद्धव ठाकरे हे भेटले आहेत. परंतु गुप्तपणे अनेकवेळा ते भेटले असून जागावाटपांवर चर्चा केली आहे. मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे आणि नाशिक या महापालिकांचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरविण्यात येणार आहे.
मनसे आणि शिवसेना (उबाठा) या दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी अनेक वर्षे महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. गेली २० वर्षे मनसे आणि शिवसेना एकमेकांच्या विरोधात लढले आहेत. पण दोन्ही पक्षांना राजकीय अस्तित्वासाठी एकत्र येण्याशिवाय पर्याय उरला नाही.
त्यामुळे अचानक युतीबाबतचा निर्णय होत असल्याने दोन्ही पक्षांच्या इच्छुक उमेदवारांची कोंडी झाली आहे. दोघांचा जनाधार मराठी असल्याने मराठीबहुल वॉर्डवर दोन्ही बाजूच्या इच्छुकांची नजर आहे. त्यामुळे हा जागावाटपांमधील कळीचा मुद्दा आहे. मुंबई महापालिकेच्या जागावाटपात ही अडचण येत आहे. त्यामुळे जागावाटप गुलदस्त्यात ठेवायची चाल आहे.
दोन्ही बाजूने तडजोड केली जाणार आहे. पण ज्या इच्छुकांनी निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे, त्या पक्षासाठी जागा सुटली नाही तर ते बंडखोरी करतील, अशी शक्यता आहे. महायुतीचे नेते अशा बंडखोरांना त्यांच्याकडे खेचतील. त्यामुळे गुप्तपणे चर्चा सुरू आहे. जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम झाल्यावर युतीची घोषणा होईल.
मराठी मतांचे विभाजन करणाऱ्या उमेदवारांवर भाजप आणि शिंदे गटाची नजर आहे. उबाठाचे अनेक माजी नगरसेवक शिंदे गटात गेले आहेत. त्यामुळे अशा उमेदवारांकडे जनाधार असेल तर त्याला महायुती बळ देईल. त्यामुळे यावरही ठाकरे बंधूंची नजर आहे.