Operation Tiger Success Pudhari
मुंबई

Operation Tiger Success: अखेर ठाकरेंचे सहा बंडखोर खासदार शिंदे सेनेत दाखल

सन्मान राखून निधी कमी पडू देणार नाही : उपमुख्यमंत्री शिंदे

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: ठाकरे शिवसेनेतील बंडखोरी केलेल्या सहा खासदारांनी अखेर सोमवारी उपमुख्यमंत्री व शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

ओमराजे निंबाळकर यांच्यासह संजय जाधव, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर यांचा या खासदारांत समावेश आहे. यावेळी रामदास कदम, गजानन कीर्तिकर, डॉ. श्रीकांत शिंदे, गुलाबराव पाटील, भरत गोगावले, तसेच पक्षाचे मंत्री, खासदार, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते.

पक्षप्रवेशानंतर माध्यमांशी संवाद साधताना शिंदे यांनी ‘ऑपरेशन टायगर’ शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा केला. लोकसभा अध्यक्षांकडे कायदेशीर आणि संसदीय प्रक्रियेनुसार आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्यात आल्याचे सांगत त्यांनी आम्ही कोणतेही ऑपरेशन अर्धवट सोडत नाही. नियोजनबद्ध आणि भक्कम पद्धतीने ते पूर्ण करतो.

आज त्याचे परिणाम सर्वांसमोर आहेत, असे सांगितले. उबाठा खासदारांच्या या पक्षप्रवेशाने शिंदेंच्या खासदारांची संख्या ७ वरून १३ तर उद्धव ठाकरे यांच्या खासदारांची संख्या घटून ९ वरून ३ झाली आहे. भाजपचे राज्यात ९ खासदार आहेत. खासदार वाढल्याने शिंदेंचे दिल्लीतील वजनही वाढणार आहे.

नंदनवन बंगल्यावर एकनाथ शिंदे यांच्या सोबत बैठक झाल्यानंतर यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडलेल्या खासदारांच्या या पक्षप्रवेश सोहळ्यात परभणीचे संजय (बंडू) जाधव, शिर्डीचे भाऊसाहेब वाकचौरे, धाराशिवचे ओमराजे निंबाळकर, ईशान्य मुंबईचे संजय दिना पाटील, यवतमाळ-वाशिमचे संजय देशमुख आणि हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

उद्धव ठाकरेंना टोला

शिवसेनेची भूमिका स्पष्ट आणि स्वच्छ आहे. काहींनी विचारधारा सोडली म्हणून महाराष्ट्राने त्यांना नाकारले. महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि जनतेच्या अपेक्षांना साजेसा विकासाचा मार्ग आम्ही स्वीकारला आहे, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.

लढ्याचा हा दुसरा टप्‍पा

२२ जून २०२२ रोजी शिवसेना, धनुष्यबाण आणि बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा वाचवण्यासाठी सुरू झालेल्या लढ्याचा हा दुसरा टप्पा आहे. सुरुवातीला ४० आमदार सोबत होते, तर आज सहा खासदारांनी शिवसेनेत प्रवेश करून त्या लढ्याला नवे बळ दिले आहे. जिथे शिवसेनेचे विचार, तिथे शिवसैनिक. त्यामुळेच हे सहा खासदार आज बाळासाहेबांच्या शिवसेनेत आले आहेत, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

मी अर्धवट ऑपरेशन करत नाही

‘ऑपरेशन टायगर’बाबत माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चेचा संदर्भ देत शिंदे म्हणाले, हे नाव पत्रकारांनी दिले असले तरी आम्ही कोणतेही ऑपरेशन अर्धवट करत नाही. आम्ही ऑपरेशन फुलप्रूफ करतो. आज सहाही खासदार शिवसेनेत सामील झाले आहेत आणि त्यामुळे ऑपरेशन टायगर पूर्णपणे यशस्वी झाले आहे. शिवसेनेत आलेले हे सर्व खासदार भविष्यात धनुष्यबाण चिन्हावरच निवडून येतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT