

मुंबई: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे पूर्वमुक्त मार्गाचा छेडानगर-घाटकोपर-आनंदनगर असा विस्तार करण्यात येत आहे. या प्रकल्पात ३२० वृक्ष तोडले जाणार असून ३८६ वृक्षांचे पुनर्रोपण केले जाणार आहे. ९४९ वृक्ष जागेवरच सुरक्षित राहणार आहेत.
पूर्वमुक्त मार्गाच्या विस्तारीकरण प्रकल्पात १ हजार ६५५ वृक्ष आहेत. प्रारंभीच्या आराखड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्ष बाधित होत होते. त्यामुळे प्रकल्पाचे संरेखन व संरचना बदलण्यात आली. यात ९४९ वृक्ष वाचवण्यात यश आले.
हे वृक्ष जागेवरच सुरक्षित राहणार आहेत. ३८६ वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. तसेच ३२० वृक्ष तोडले जाणार आहेत. यासाठी भरपाई वृक्ष लागवड म्हणून ७ हजार ६६६ वृक्ष लावण्यात येणार आहेत.
पूर्वमुक्त मार्ग विस्तार प्रकल्प १३.९ किमीचा आहे. मुख्य पूर्वमुक्त मार्ग चेंबूर ते सीएसएमटी असा असून तो २०१३ साली वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. यामुळे चेंबूर ते सीएसएमटी प्रवास तर अतिजलद झाला, पण चेंबूरपासून पुढे जाताना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे चेंबूरपासून पुढे घाटकोपर ते ठाणे असा पूर्वमुक्त मार्गाचा विस्तार केला जाणार आहे.
पिंक ट्रम्पेट वृक्षही बाधित
पूर्वमुक्त मार्गावरील पिंक ट्रम्पेट वृक्ष हे वैशिष्ट्य आहे. या झाडांना येणाऱ्या गुलाबी फुलांमुळे मार्गाचे सौंदर्य खुलते. या प्रकल्पात १७८ पिंक ट्रम्पेट वृक्ष आहेत. यापैकी १२७ वृक्ष जागेवरच सुरक्षित राहणार आहेत. १३ वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. ३८ वृक्ष मात्र तोडले जाणार आहेत.