Jail Pudhari
मुंबई

Mumbai DRI Operation: मुंबईत २ किलो सिंथेटिक ड्रग्ज, ९,२३० ई-सिगारेट जप्त; दोन परदेशी महिलांना अटक

डीआरआयचा दुहेरी दणका

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) मुंबईने तस्करीविरोधात दोन स्वतंत्र कारवायांमध्ये मोठे यश मिळवले. एका कारवाईत सुमारे २ किलो सिंथेटिक अंमली पदार्थ जप्त करून दोन परदेशी महिलांना अटक करण्यात आली, तर दुसऱ्या कारवाईत न्हावा शेवा बंदरावर ९,२३० बंदी असलेल्या ई-सिगारेट जप्त करण्यात आल्या.

डीआरआयला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दिल्लीहून मुंबईत आलेल्या दोन परदेशी महिला प्रवाशांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या सामानाची कसून तपासणी केली असता अम्फेटामाइन क्रिस्टल्स आणि एमडीएमए गोळ्या विशेष बनविलेल्या गुप्त कप्प्यांमध्ये लपवून आणल्याचे उघड झाले.

हे उच्च दर्जाचे सिंथेटिक अंमली पदार्थ मुंबईत वितरणासाठी आणल्याचा संशय असून, दोघींविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली असून, या रॅकेटमागील देशांतर्गत नेटवर्कचा डीआरआय शोध घेत आहे.

याचवेळी न्हावा शेवा बंदरावर आणखी एका गुप्त कारवाईत एलईडी लाईट्स आणि फिटिंग्ज असल्याचे खोटे घोषित केलेल्या आयात मालाची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये विविध प्रीमियम ब्रँडच्या ९,२३० ई-सिगारेट लपवून ठेवण्यात आल्याचे आढळले.

जप्त मालासह संपूर्ण खेपेची (कन्साइनमेंट) किंमत सुमारे ३.७० कोटी असल्याचे डीआरआयने सांगितले. भारतात इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंध अधिनियम, २०१९ अंतर्गत ई-सिगारेटचे उत्पादन, आयात, निर्यात, वाहतूक, विक्री, साठवणूक आणि जाहिरातीवर पूर्ण बंदी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT