नवी मुंबई : सायन–पनवेल महामार्गावरील वाशीकडून नेरुळकडे जाणाऱ्या मार्गावर तुर्भे येथील उड्डाणपुलावर मोठमोठे आणि जीवघेणे खड्डे पडले असून यामुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांचा अंदाज येत नाही. यामुळे हजारो वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे येथे मोठ्या अपघाताची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सायन–पनवेल महामार्ग हा मुंबई, ठाणे, नवी मुंबई तसेच रायगड जिल्ह्याला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असून या रस्त्यावर दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. तुर्भे उड्डाणपुलावर अनेक ठिकाणी रस्ते उखडून खोल खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी साचल्यामुळे खड्डे दिसत नसल्याने वाहनचालकांना अचानक ब्रेक मारावे लागत आहेत.
अनेकजण खड्डे चुकविण्यासाठी वाहनांची दिशा बदलत असल्याने मागून येणाऱ्या वाहनांनाही अपघाताचा धोका निर्माण होत आहे. दुचाकीस्वारांसाठी हा मार्ग अधिक धोकादायक ठरत आहे. चारचाकी वाहनांचेही नुकसान होत असून टायर, सस्पेन्शन आणि इतर यांत्रिक भागांवर त्याचा परिणाम होत असल्याची तक्रार वाहनचालकांकडून केली जात आहे.
सकाळी व सायंकाळी कार्यालयीन वेळेत या खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग कमी होत असल्याने वाहतूक कोंडी निर्माण होत असून प्रवाशांचा वेळ वाया जात आहे. प्रत्यक्षात तुर्भे उड्डाणपुलावरील रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे.