

The potholes at Sathe Chowk on VIP Road were once again visible
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील लेबर कॉलनी परिसरातील अण्णा भाऊ साठे चौकात महापालिकेने नुकत्याच केलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामाची पहिल्याच पावसात दाणादाण उडाली आहे. अवघ्या तीन-चार दिवसांपूर्वी खड्डे बुजविण्यासाठी टाकण्यात आलेली खडी पावसाच्या पाण्याबरोबर वाहून गेल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील अण्णा भाऊ साठे चौकालगतचा रस्ता पुन्हा खड्यांनी व्यापला असून, वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या व्हीआयपी मार्गावरील अण्णा भाऊ साठे चौकातून दिवसभर मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते, मात्र या रस्त्यावर मोठे खड्डे निर्माण झाले असून, महापालिकेकडून करण्यात आलेले पॅचवर्क टिकू न शकल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे हे खड्डे वळणाच्या ठिकाणी असल्याने वाहनचालकांना त्यांचा अंदाज येणे कठीण ठरत आहे.
तसेच सततच्या पावसामुळे खड्यांमध्ये पाणी साचत असल्याने या खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे दुचाकी तसेच चारचाकी वाहनचालकांचा अंदाज चुकून अपघाताचा धोका वाढला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. दरम्यान महापालिकेने केलेली ही दुरुस्ती केवळ दिखाऊ ठरल्याची टीका नागरिकांकडून होत आहे.
या मार्गावरील खड्यांसाठी दर्जेदार साहित्य वापरून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याऐवजी केवळ खडी टाकून खड्डे बुजविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने सार्वजनिक निधीचा अपव्यय झाल्याचाही आरोप नागरिकांनी केला आहे. या रस्त्याची तातडीने दर्जेदार आणि कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. तसेच भविष्यात एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी महापालिकेची राहील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.