Pan Masala ad Controversy : जाहिरातीद्वारे अप्रत्यक्षपणे पानमसाल्याचे प्रमोशन केल्याप्रकरणी महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) बॉलिवूड अभिनेते शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांनी ही कारवाई केली असून, तिन्ही अभिनेत्यांना यावर १५ दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.
महाराष्ट्रात पानमसाल्याच्या उत्पादन, साठवणूक, वितरण आणि विक्रीवर पूर्णपणे बंदी आहे. असे असताना २०२४ मध्ये या तिन्ही अभिनेत्यांनी एका पानमसाला कंपनीच्या उत्पादनाच्या जाहिरातीत एकत्र काम केले होते.अन्न सुरक्षा प्रमुख तुकाराम मुंडे यांनी ११ ऑगस्ट रोजी ही ९ पानांची नोटीस जारी केली. या नोटीसमध्ये तिन्ही अभिनेत्यांना या मोहिमेतील आपला सहभाग तात्काळ थांबवण्याचे आणि अधिकृत सोशल मीडिया खात्यांवरून या जाहिरातीशी संबंधित सर्व प्रमोशनल कंटेंट काढून टाकण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
तुकाराम मुंडे यांनी नोटीसमध्ये नमूद केले आहे की, "प्राथमिक पाहणीत असे दिसून येते की, संबंधित जाहिरात प्रामुख्याने पानमसाल्याशी जोडलेला आहे. महाराष्ट्रात सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षेच्या नियमांनुसार पानमसाल्याच्या उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्रीवर पूर्ण बंदी आहे. जाहिरातीमुळे ग्राहकांच्या मनात बंदी घातलेल्या ब्रँडची प्रतिमा निर्माण होते. यामुळे ग्राहकांची दिशाभूल होऊ शकते आणि हे अप्रत्यक्षपणे प्रतिबंधित उत्पादनाचेच प्रमोशन ठरते, असेही नोटीसमध्ये म्हटले आहे.
गुटखा आणि इतर बंदी घातलेल्या तंबाखूजन्य पदार्थांवर कठोर कारवाईचा धडाका लावणारे तुकाराम मुंडे यांनी तिन्ही अभिनेत्यांकडे त्यांच्या एंडॉर्समेंट कराराच्या प्रती, मोहिमेची माहिती, मानधनाचे तपशील आणि जाहिरात स्वीकारण्यापूर्वी केलेल्या पडताळणीचे पुरावे मागवले आहेत. ग्राहक संरक्षण कायद्यानुसार, अशा प्रकारे दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींमध्ये सहभागी आढळल्यास अभिनेत्यांवर १० लाख ते ५० लाख रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. तसेच कोणत्याही उत्पादनाची जाहिरात करण्यावर तीन वर्षांपर्यंतची बंदीही घातली जाऊ शकते.
याआधी २०२२ मध्ये अभिनेता अक्षय कुमार यानेदेखील शाहरुख खान आणि अजय देवगण यांच्यासोबत संबंधित जाहिरातीत काम केले होते. मात्र, चाहत्यांच्या तीव्र तीव्र आक्षेपानंतर त्याने जाहीर माफी मागितली होती.सोशल मीडियावर चाहत्यांची नाराजी पाहिल्यानंतर अक्षय कुमारने 'एक्स'वर पोस्ट करत म्हटले होते की, "मी माझ्या सर्व चाहत्यांची आणि हितचिंतकांची माफी मागतो. गेल्या काही दिवसांतील तुमच्या प्रतिक्रियांचा माझ्यावर खोल परिणाम झाला आहे. मी कधीही तंबाखूचे समर्थन केले नाही आणि करणारही नाही. जाहिरातमधील माझ्या सहभागावर तुम्ही व्यक्त केलेल्या भावनांचा मी आदर करतो आणि नम्रपणे या मोहिमेतून मागे हटत आहे." तसेच अक्षयने या जाहिरातीतून मिळालेले संपूर्ण मानधन एका चांगल्या कामासाठी दान करण्याचा निर्णय घेतला होता आणि भविष्यात जाहिराती निवडताना अधिक काळजी घेण्याचे आश्वासन दिले होते.