मुंबई: जनतेच्या आरोग्यासाठी पनीरचे नाव सांगत कृत्रिम पनीर विकू नये, अनालॉग चीज असे नाव लिहावे, ते न देता ते विकू नये असे आदेश काढले गेले होते तरी ते पाळले गेलेले नाहीत. त्यामुळे अशा पनीरच्या वापरावर एक वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाने गोळा केलेल्या पनीरच्या नमुन्यांमध्ये सुमारे ७० टक्क्यापेक्षा जास्त नमुन्यांमध्ये भेसळीचे प्रमाण आढळले असल्याने आता अनालॉग चीज विकण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
एक वर्ष ही बंदी लागू असेल. या संदर्भातला आदेश जारी करण्यात आला आहे. त्यानुसार यापुढे दुधापासूनच पनीर तयार करणे बंधनकारक असेल. यासंदर्भात अन्न व औषधी प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मोहीम राबवली होती.
मात्र खुल्या बाजारात विकल्या जाणाऱ्या पनीरबाबत जारी केलेल्या नियमांचे कोणतेही पालन झाल्याचे दिसलेले नाही. या मोहिमेदरम्यान राज्यभरात गोळा केलेल्या नमुन्यांपैकी ४० टक्के नमुने आरोग्यासाठी धोकादायक भेसळ केलेले आढळले होते.
त्यामुळे मंगळवारी रात्री उशिरा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी हे कृत्रिम पनीर विकण्यास बंदी घालणारा आदेश जारी केला आहे.