रायगड ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत व भाभा अणू संशोधन केंद्र, ट्रॉम्बे,मुंबई यांनी विकसित केलेली ट्रॉम्बे कोकण महान ही भात जात राज्यस्तरीय वाण निवड समितीने प्रसारित करण्याची शिफारस केली आहे. प्रती हेक्टर 50 ते 55 क्विंटल उत्पादकाता असणारे हे वाण पाणथळ जमीनीकरिता उत्कृष्ठ वाण असल्याचा दावा विद्यापाठीने केला आहे.
ट्रॉम्बे कोकण महान ही गरवी भात जात असून तिचा कालावधी 140 ते 145 दिवसांचा आहे. दाण्याचा प्रकार लांबट बारीक असून उंची मध्यम म्हणजे 105 ते 110 से. मी.आहे.उत्पादन क्षमता संकरित भातासारखी सरासरी 50 ते 55 क्विंटल प्रती हेक्टर आहे.योग्य व्यवस्थापन केल्यास 100 क्विंटल प्रती हेक्टर उत्पादन मिळू शकेल, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. कोकण, प.महाराष्ट्र, विदर्भाच्या सर्व भागात लागवडीसाठी वाण प्रसारित पुसा बासमती आणि रत्नागिरी-24 या दोन वाणांच्या संकरातून ही जात तयार केली आहे.या वाणाच्या भरडाईचे प्रमाण 69.55 टक्के असून अखंड तांदळाचे प्रमाण 61.25 टक्के आहे.तांदूळ चकचकीत असून पिटुळपणा नसल्याने तांदळाची गुणवत्ता उत्तम आहे.अमायलोजचे प्रमाण 24.8 टक्के म्हणजे मध्यम आहे.तांदूळ शिजवल्यानंतर भात मोकळा होतो, चिकट होत नाही. या जातीची शिफारस संयुक्त संशोधन समिती (जॉइन्ट अग्रेस्को)ने आधीच केली आहे. राष्ट्रीय स्तरावर अधिसूचनेसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.त्यामुळे ही जात कोकण, प.महाराष्ट्र, विदर्भ अशा महाराष्ट्रातील सर्व भागात लागवडीसाठी प्रसारित करण्यात आली आहे.
डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.संजय भावे यांच्या मार्गदर्शनाखाली भात विशेषज्ञ डॉ.भरत वाघमोडे, वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. रमेश कुणकेरकर,सहा.भात पैदासकार डॉ.महेंद्र गवई, वनस्पती शरीरक्रियाशास्त्रज्ञ डॉ. मीनाक्षी केळुस्कर, सहा.भात विशेषज्ञ डॉ. प्रवीण वणवे, भाभा अणू संशोधन केंद्र, ट्रॉम्बेचे शास्त्रज्ञ डॉ. बी. के. दास व डॉ. विकासकुमार यांचा ही जात विकसित करण्यात समावेश आहे.
ट्रॉम्बे कोकण महान या जातीचे बियाणे खरीप 2026 मध्ये मर्यादित स्वरूपात उपलब्ध होईल.राज्यातील 20 टक्के पाणथळ जमिनीसाठी ही उत्कृष्ट वाण ठरणार आहे.डॉ. रवींद्र मर्दाने, कृषी विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ