Tiger Shroff Shooting Case : बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण सिनेसृष्टी हादरली आहे. मात्र, हल्लेखोरांच्या टार्गेटवर आधी टायगर श्रॉफ नव्हताच, असा धक्कादायक खुलासा पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत झाला आहे.
आरोपी मुंबईत एका व्यक्तीला मारण्यासाठी आले होते. मात्र त्यांना ठरवलेल्या टार्गेटपर्यंत सहज पोहोचता आले नाही. यानंतर त्यांनी टायगर श्रॉफवर गोळीबार केला. कारण टायगर श्रॉफसोबत पोलीस बंदोबस्त नसतो, याची माहिती हल्लेखोरांना चाहत्यांच्या रील्सवरून मिळाली होती.
हल्लेखोरांचे टार्गेट वेगळीच व्यक्ती होती. मात्र संबंधित व्यक्तीसोबत असणाऱ्या सुरक्षा व्यवस्थेमुळे हा प्लॅन रद्द करावा लागला. यानंतर दोघांनी बॉलिवूडमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी अभिनेता टायगर श्रॉफ याला थेट जीवे मारण्याचे ठरवले होते. टायगर श्रॉफ आणि त्याच्या चाहत्यांच्या इन्स्टाग्रामवरून हल्लेखोरांनी रेकी करत टायगर श्रॉफच्या मूव्हमेंट्स ट्रेस केल्या होत्या, असेही तपासात स्पष्ट झाले आहे.
मुंबईतील जुहू परिसरात टायगर श्रॉफच्या कारवर तिघांनी तीन राऊंड गोळ्या झाडल्या. यात टायगर थोडक्यात बचावला, पण त्याच्या चालकासह दोघे जखमी झाले. हल्ल्यानंतर अनिल पंडितची एक ऑडिओ क्लिप समोर आली असून त्याने चित्रपटसृष्टीला थेट आव्हान दिले आहे. अभिनेता सलमान खानसोबत काम करणाऱ्या कलाकारांना इशारा देताना तो म्हणाला, ‘सब का नंबर आयेगा’. याप्रकरणी कोटा येथून अटक करण्यात आलेले शूटर रेहान आणि हृतिक कुमार हे थेट अनिल पंडितच्या संपर्कात होते. प्राथमिक चौकशीनुसार, नेपाळमार्गे पळून जाण्याचा कट रचणाऱ्या या शूटर्सना अमेरिकेतून पंडितच दिशानिर्देश देत होता. हल्ल्यानंतर सोशल मीडियावर अनिल पंडित (अनमोल बिष्णोई या नावाने) जबाबदारी स्वीकारणारा संदेश प्रसारित करून ते अकाउंट लगेच डिलीट करण्यात आले.