Tiger Shroff Firing Case Pudhari
मुंबई

Tiger Shroff Firing Case : "नशिले पदार्थ देऊन मुलाला कृत्यात गोवले!" टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणावर संशयिताच्या आईचा दावा

सोनिपत येथील वेल्डिंगचे काम करणारा रेहान २० दिवसांपासून होता गायब

पुढारी वृत्तसेवा

Tiger Shroff Firing Case : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. यातील एका संशयित आरोपी रेहानच्या आईने दावा केला आहे की, "माझ्या मुलाला आमिष दाखवून फसवले गेले. त्याला नशिले पदार्थ सेवन करायला दिले असावे. त्यानंतर त्याला गुन्ह्याच्या कृत्यात ओढले गेले असावे."

हरियाणातून दोघे तर बिहारमधील एकाला अटक

रविवार, १८ ऑक्टोबर रोजी जुहू परिसरात दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार केला होता. या हल्ल्यातून टायगर श्रॉफ थोडक्यात बचावला, त्याला किरकोळ जखमा झाल्या. त्याचा चालक आणि एक अन्य व्यक्ती जखमी झाले. या गोळीबार प्रकरणी हरियाणातील सोनीपत येथील दोन आरोपी आणि बिहारमधील २२ वर्षीय हृतिक कुमार या तिघांना अटक करण्यात आली आहे.

२० दिवस मुलाशी संपर्क नाही

'पीटीआय'च्या वृत्तानुसार, सोनीपत येथील आरोपी रेहानच्या आई शमशिदा हिने सांगितले की, काही दिवसांपूर्वी बिहारमधील एक तरुण त्यांच्या घरी आला होता. त्याने रेहानला वेल्डिंग शिकवण्याचे आणि चांगले पैसे मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यानंतर तो रेहानला सोबत घेऊन गेला. त्यानंतर २० दिवस तिचा मुलाशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही.

रेहान करत होता वेल्डिंगचे काम

शमशिदा यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा कुटुंबाला मदत करण्यासाठी गुरुग्राममध्ये वेल्डिंगचे काम शिकत होता. बिहारमधील तरुणाने सांगितले होते की, त्याचा भाऊ गुरुग्राममध्ये वेल्डिंगचे काम करतो. ते रेहानला काम शिकवतील, तसेच त्याला चांगले पैसेही मिळतील. रेहानला घरी येऊन घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला त्या ओळखत नव्हत्या; मात्र जेव्हा जेव्हा त्याच्या मोबाईल फोनवर फोन केला, तेव्हा तो बंद येत होता.

नशिले पदार्थ दिल्याचाही आरोप

शमशिदा यांनी आरोप केला आहे की, रेहानला सोबत नेण्यापूर्वी त्याला काहीतरी नशिले पदार्थ सेवन करायला दिले असावे. काही लोक तरुणांचा गैरफायदा घेतात आणि त्यांनीच रेहानचा वापर करून घेतला आहे. अशा प्रवृत्तीचे लोक तरुणांचा वापर करून घेत आहेत, त्यांच्याकडून चुकीची कामे करून घेत आहेत. रेहानला मी एवढेच सांगेन की, त्याने चुकीचे कृत्य केले असून त्याने कोणाच्याही दबाबाखाली गुन्हेगारी कृत्य करू नये.

रेहानला झाली होती 'आर्म्स ॲक्ट' अंतर्गत अटक

दरम्यान, रेहानचे वडील रईसुद्दीन यांनी सांगितले की, यापूर्वी तो 'आर्म्स ॲक्ट' अंतर्गत दाखल झालेल्या एका प्रकरणात अटकेत होता. काही दिवसांनंतर त्याची जामिनावर सुटका झाली होती. आईनेच त्याच्या जामिनाची व्यवस्था केली होती. तसेच, रेहान याने इयत्ता नववीतच शाळा सोडली होती. गेल्या दहा वर्षांपासून तो त्यांच्यासोबत राहत नव्हता. तो त्याच्या आईसोबत देवदू गावात राहत होता. गोळीबाराच्या घटनेत रेहानच्या सहभागास त्याचे मित्रच जबाबदार असल्याचा दावाही त्यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT