मुंबई : मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील एसी लोकल सेवांना दिवसेंदिवस प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असला, तरी तिकीट तपासणीच्या अभावामुळे विनातिकीट प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याची तक्रार प्रवाशांकडून होत आहे. विशेषतः सकाळच्या आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत तिकीट तपासनीस फारसे दिसत नसल्याने अनेक जण एसी तिकीट किंवा मासिक पास न घेता सर्रास एसी डब्यांतून प्रवास करत असल्याचा आरोप आहे. परिणामी, नियमाने महागडे एसी तिकीट किंवा पास खरेदी करणाऱ्या प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
मध्य रेल्वेने १ मेपासून हार्बर मार्गावर अतिरिक्त एसी लोकल फेऱ्या सुरू केल्यानंतर त्याला विशेषतः नोकरदार प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे. पनवेलहून सकाळी ८.४५ आणि ९.०९ वाजता सीएसएमटीकडे सुटणाऱ्या एसी लोकल गर्दीच्या वेळेत अक्षरशः भरून धावत आहेत. मात्र, या गाड्यांमध्ये नियमित तिकीट तपासणी होत नसल्याची प्रवाशांची तक्रार आहे.
सायंकाळी सीएसएमटीहून ६.३० आणि रात्री ८.०० वाजता सुटणाऱ्या एसी लोकलही नवी मुंबईकडे जाणाऱ्या नोकरदारांसाठी महत्त्वाच्या ठरल्या आहेत. त्यापैकी रात्री ८.०० वाजता सुटणारी एसी लोकल पनवेलला रात्री ९.२१ वाजता पोहोचते. या गाडीमध्येही दररोज मोठी गर्दी असते. मात्र, तिकीट तपासणी जवळपास होत नसल्याने मोठ्या प्रमाणात विनातिकीट प्रवासी एसी डब्यांतून प्रवास करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नियम पाळून एसी पास किंवा तिकीट घेणाऱ्या प्रवाशांमध्ये संताप वाढला असून, गर्दीच्या वेळेत विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
यात भर म्हणजे एसी लोकलच्या अचानक रद्द होणाऱ्या फेऱ्यांमुळेही प्रवाशांचा मनस्ताप वाढत आहे. बुधवारी पनवेलहून सकाळी ११.४३ वाजता सीएसएमटीकडे सुटणारी एसी लोकल नियोजित वेळेनुसार थोडी उशिरा पनवेल स्थानकावर दाखल झाली; मात्र ऐनवेळी ती रद्द करण्यात आली. त्यामुळे एसी पासधारकांना अचानक रद्द झाल्याची घोषणा ऐकावी लागली. परिणामी, अनेक प्रवाशांना पुढील गाडीची प्रतीक्षा करावी लागली, तर काहींना गर्दीच्या सामान्य लोकलमधून प्रवास करावा लागला. अशा प्रकारे एसी लोकलच्या अचानक रद्द होणाऱ्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे.
विनातिकीट प्रवाशांवर कठोर कारवाई करा
हार्बर मार्गावरील एसी लोकल सेवा सुरू झाल्यापासून प्रवाशांचा प्रतिसाद सातत्याने वाढत आहे. आरामदायी आणि वेळेची बचत करणारा प्रवास मिळावा म्हणून अनेक प्रवासी अतिरिक्त भाडे मोजत आहेत. मात्र, वाढत्या प्रतिसादाच्या तुलनेत तिकीट तपासणी आणि सेवा व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रामाणिक प्रवाशांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. पीक अवरमध्ये विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवून विनातिकीट प्रवाशांवर कठोर कारवाई करावी तसेच एसी लोकलच्या अचानक फेऱ्या रद्द करण्याचे प्रकार थांबवावेत, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.