

बीड - शहरातील बसस्थानकाच्या पाठीमागील बाजूने असलेल्या रस्त्यावर विविध स्टॉलधारक व अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांनी व्यापून गेलेला आहे. या रस्त्यावरून सर्वसामान्यांना चालणेही अवघड झाले आहे. आता नगरपापलिकेने हा रस्ता हे स्टॉलधारक आणि अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना राखीव ठेवला असल्याचे जाहीर करावे, म्हणजे सर्वसामान्य नागरिक त्या रस्त्याने जाणारच नाहीत, अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर प्रशासन उपाययोजना करणार का? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून संतोषी माता टॉकीजकडे जाणाऱ्या रस्त्यावर परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. या रस्त्यावर अनेक सीमकार्ड विक्रेते मोठ्या छ्या लावून बसलेले दिसतात. त्यांच्या या छ्या थेट अर्ध्या रस्त्यापर्यंत येतात, ज्यामुळे रस्त्यावरील वाहतूक खोळंबत आहे. त्यातच या स्टॉल्सच्या बाजूला ग्राहकांची लागणारी वाहने आणि अस्ताव्यस्त पार्किंगमुळे रस्त्याचा मोठा भाग व्यापला जातो.
हा रस्ता बस स्टैंड, संतोषी माता टॉकीज, सम्राट चौक, डीपी रोड आणि आदर्श नगरकडे जाणारा मुख्य मार्ग असल्याने येथे शाळा, कॉलेज आणि विविध ट्यूशन क्लासेसला जाणाऱ्या लहान मुला-मुलींची तसेच महिलांची संख्या खूप मोठी असते. अनेक विद्यार्थी आणि पालक आपल्या दुचाकीवरून (बाईकवरून) या रस्त्याने जात असतात. परंतु, रस्त्यावर आलेल्या या सीमकार्ड विक्रेत्यांच्या छत्र्यांचा अंदाज न आल्यामुळे, बाईकवरून जाणाऱ्या लहान मुला-मुलींचे हात आणि कपडे या ज्यांमध्ये अडकून अनेकदा गंभीर अपघात झाले आहेत.
सुदैवाने आतापर्यंत मोठा अनर्थ टळला असला, तरी रोज घडणाऱ्या या छोट्या मोठ्या अपघातांमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नगरपालिकेचा अतिक्रमण विभाग आणि वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक वैभव पाटील यांनी या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे. एखादा मोठा अपघात होऊन निष्पाप बालकाचा किंवा नागरिकाचा जीव जाण्यापूर्वी येथील अनधिकृत अतिक्रमण लवकरात लवकर दूर करावे, अशी तीव्र मागणी शहरातील पालक आणि नागरिकांतून होत आहे.
एसटी महामंडळाला फटका; पण तक्रार नाही?
बसस्थानकाच्या नूतनीकरणानंतर समोरील बाजूस दोन मोठे गेट करण्यात आले आहेत, याबरोबरच पाठीमागील बाजूसदेखील एक छोटे आणि एक मोठे गेट आहे. या पाठीमागील रस्त्यावरच ग्रामीण भागात अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने उभी असतात तर समोरच्या रस्त्यालगत संभाजीनगर व इतर ठिकाणी जाणारी वाहने उभी असतात. त्या वाहनांचे चालक बसस्थाकनकातून प्रवासी घेऊन जातात, यामुळे एसटी महामंडळाला मोठा तोटा सहन करावा लागतो. या सर्व प्रकाराची तक्रार एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनीच करायला हवी होती, परंतु ती करण्यात आली का? केली असती तर त्याचा पाठपुरावा केला गेला का? असे देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
अवैध प्रवासी वाहनांचा अड्डा
बसस्थानकाच्या पाठीमागील बाजूला असलेला हा रस्ता या भागातील इतर रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी टाळली जावी याकरिता करण्यात आला होता. त्याचा परिणामदेखील चांगल्या पद्धतीने दिसून आला. परंतु अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने, विविध स्टॉल्सचालकांनी मात्र या रस्त्यावर आपले ठाण मांडले आहे. अक्षरशः हा अवैध प्रवासी वाहतुकीचा अड्डा बनला आहे. परंतु यावर कोणीही कारवाई करत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.