मुंबई: पंजाबहून विक्रीसाठी आणलेल्या विदेशी घातक शस्त्रांसह जशन प्रितमंगल सिंह, सुखविंदर चंद्रपाल आणि अरबाज अन्वर चौधरी या तिघांना गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी तीन विदेशी पिस्तुले मॅगझीनसह 45 जिवंत काडतुसे जप्त केली आहे.
यातील अरबाज, जशन आणि सुखविंदर यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल असून याच गुन्ह्यांत ते चार वर्षांपासून फरार असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
फोर्ट परिसरात काहीजण घातक शस्त्रांची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती खंडणीविरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीनंतर फोर्ट येथील सेंट जॉर्ज हॉस्पिटलजवळील पी. डिमेलो रोड, ईस्टर्न फ्रिवेकडे जाणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यावरील उत्तर वाहिनीवर पोलिसांनी साध्या वेशात पाळत ठेवली होती. रात्री पावणेबारा वाजता तिथे तीन तरुण आले होते.
या तिघांची हालचाल संशयास्पद वाटताच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे पोलिसांना तीन विदेशी पिस्तुले, तीन मॅगझीन आणि 45 जिवंत काडतुसे सापडली. चौकशीत त्यांनी घातक शस्त्रे मुंबई शहरात विक्रीसाठी घेऊन आल्याचे सांगितले. त्यांच्याविरुद्ध घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
हत्येच्या गुन्ह्यात आरोपी चार वर्षे होते फरार
अरबाज हा राजस्थान तर इतर दोघेही पंजाबच्या पटियालाचे रहिवाशी आहेत. चौकशीत 2022 साली जशन सिंह आणि सुखविंदर चंद्रपाल यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल आहे. ते दोघेही गेल्या चार वर्षांपासून वॉण्टेड होते.