The India Meteorological Department (IMD) issued a yellow alert for Mumbai on Tuesday
मुंबई : पुढारी वृत्तसेवा
हवामान खात्याकडून पुन्हा एकदा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मंगळवारी शहरात मेघगर्जनेसह वीजांचा कडकडाट, हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि जोरदार वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी आकाशात गडगडाटी वातावरण राहण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागानं (IMD) मंगळवारी मुंबईसाठी यलो अलर्ट जारी करत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केलं आहे. शहरात काही ठिकाणी मेघगर्जनेसह वीजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि झपाट्याने वाहणाऱ्या वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे.
१३ आणि १४ मे रोजी काही भागांत पावसाच्या हलक्या सरी सुरू राहण्याची शक्यता असून, त्यानंतर हवामान पुन्हा कोरडे होण्याची चिन्हं आहेत. आठवड्याच्या मध्यावर शहरात आकाश निरभ्र होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
गेल्या आठवड्यात सलग चार दिवस मुंबई यलो अलर्टखाली होती. याच काळात मुसळधार पावसाच्या सरी आणि जोरदार वाऱ्यांमुळे मुंबईला दशकातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक पावसाळी मे महिना अनुभवायला मिळाला. IMD च्या कुलाबा केंद्रावर ४८.७ मिमी आणि सांताक्रूझ केंद्रावर ३८.४ मिमी पावसाची नोंद झाली होती.
यासोबतच किमान तापमानात लक्षणीय घट झाली होती. कुलाबा येथे २२.२ अंश सेल्सियस इतकं किमान तापमान नोंदवण्यात आलं, जे १९५१ नंतरचा सर्वात थंड मे महिना ठरला. सांताक्रूझमध्ये गुरुवारी सकाळी २०.६ अंश सेल्सियस इतकं किमान तापमान नोंदवण्यात आलं. हवामान विभागानं नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, तसेच अनावश्यक प्रवास टाळावा, असा सल्ला दिला आहे.