मुंबई/पुणे : आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्यात मोठ्या राजकीय उलथापालथी सुरू झाल्या आहेत. मुंबईत अपेक्षेप्रमाणे ठाकरे बंधू एकत्र येण्यावर शिक्कामोर्तब झाले. बुधवारी दुपारी शिवसेना (उबाठा) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या युतीची घोषणा होणार आहे.
मुंबईत या घडामोडी घडत असताना दुसरीकडे पुण्यातही मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काका शरद पवारांविरोधात बंड पुकारून पक्ष फोडणारे त्यांचे पुतणे अजित पवार आता पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये शरद पवारांसह आघाडीत जाण्याची शक्यता आहे. परंतु, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्यास तीव्र विरोध दर्शवत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. पुण्यात काँग्रेसला सोबत घेण्याच्या राष्ट्रवादी (अजित पवार) च्या हालचाली सुरू आहेत.
गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत सुरू असलेल्या चर्चेमुळे निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता होती, त्याचे रूपांतर आता बंडात झाले असून प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याने पुण्यात शरद पवार गटात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. दरम्यान, प्रशांत जगताप यांचा राजीनामा अद्याप माझ्यापर्यंत आला नसल्याचे खा. सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
प्रशांत जगताप यांची नाराजी
प्रशांत जगताप यांनी सुरुवातीपासूनच अजित पवार यांच्या गटासोबत कोणत्याही प्रकारची युती नको, अशी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांनी यापूर्वी शरद पवार यांची भेट घेऊन महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवल्यास पक्षाला काय फायदा होईल आणि अजित पवार यांच्या सोबत गेल्यास काय तोटा होईल, याचे सविस्तर राजकीय गणित मांडले होते. खुद्द शरद पवार यांनीही सुरुवातीला दादांच्या गटासोबत न जाण्याचे संकेत दिले होते. मात्र अचानक खासदार सुप्रिया सुळे यांनी स्थानिक नेत्यांना अजित पवार यांच्या गटाशी चर्चेचे निर्देश दिल्याने प्रशांत जगताप प्रचंड नाराज झाले आहेत.
पुण्यात राष्ट्रवादीची काँग्रेससोबतही चर्चा
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकत्र निवडणूक लढवण्याच्या हालचाली सुरू आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील काँग्रेसचे निरीक्षक माजी मंत्री सतेज पाटील यांच्यासोबत आघाडी म्हणून पुणे महापालिकेत एकत्र निवडणूक लढवण्याबाबत प्राथमिक चर्चा केली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी दिली. पण त्याचबरोबर शरद पवार जर अजित पवार यांच्यासोबत जाणार असतील तर शिवसेना ठाकरे गट त्यांच्यासोबत जाणार नाही. शिवसेना आणि मनसे एकत्र पुणे महानगरपालिकेत लढतील, अशी घोषणा संजय राऊत यांनी केली असल्याने कशा पद्धतीने आघाड्या होतील याबाबत अनिश्चितता आहे.