

मुंबई : काँग्रेसच्या विधान परिषद सदस्या प्रज्ञा सातव यांनी त्यांच्या विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने काँग्रेसचा विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावरील दावा धोक्यात आला आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसने आमदार सतेज पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव दिला होता. मात्र, आता काँग्रेस आणि उबाठा शिवसेनेची सदस्य संख्या समान झाल्याने महाविकास आघाडीला त्याबाबत एकत्र निर्णय घ्यावा लागणार आहे.
प्रज्ञा सातव यांच्या सदस्यत्वाची मुदत 2030 पर्यंत होती. मात्र, त्यांनी भाजप प्रवेश करतानाच आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. सातव यांच्या राजीनाम्याने विधान परिषदेतून काँग्रेसचे संख्याबळ एकने कमी होऊन ते सहा झाले आहे. विधानसभा आणि विधान परिषदेत सध्या विरोधी पक्षनेता नाही. विधानसभेत संख्याबळाचे कारण सांगत अद्याप विरोधी पक्षनेत्याची निवड करण्यात आलेली नाही. त्यामुळे ठाकरे गटाचे विधानसभा गटनेते भास्कर जाधव हे प्रतीक्षेत आहेत.
विधान परिषदेत ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपल्याने ते सभागृहातून निवृत्त झाले असल्याने तेथील विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहे. शिवसेनेपेक्षा काँग्रेसचे संख्याबळ एक सदस्याने जास्त आल्याने काँग्रेस विधिमंडळ पक्षाने विरोधी पक्षनेतेपदासाठी सतेज पाटील यांच्या नावाची शिफारस केली आहे. मात्र सातव यांच्या राजीनाम्यानंतर आता काँग्रेसची सदस्यसंख्याही शिवसेना ठाकरे गटाएवढी झाली आहे. दोन्ही पक्षांचे प्रत्येकी सहा आता सभागृहात आहेत. अशावेळी उबाठा शिवसेना सतेज पाटील यांचा दावा मान्य करणार काय, हे येत्या काळात स्पष्ट होईल.
ठाकरे गटाचा पाठिंबा आता आवश्यक
विधान परिषदेत 78 सदस्य आहेत. विरोधी पक्षनेतेपदासाठी 10 टक्के सदस्य संख्येचा निकष गृहीत धरला तर एका पक्षाची सदस्य संख्या 8 असणे आवश्यक आहे. मात्र विधान परिषदेतील 22 जागा रिक्त आहेत. त्यामुळे काँग्रेसचे सहा सदस्य असले तरी सतेज पाटील हे विरोधी पक्षनेते होऊ शकतात. त्यासाठी ठाकरे गटाचे समर्थन त्यांना घ्यावे लागेल. तसेच विधान परिषदेच्या सभापतींनी विरोधी पक्षनेता निवडीवर निर्णय घेणे आवश्यक ठरणार आहे.