मुंबई : राजन शेलार
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधूंच्या संभाव्य जवळीकीची चर्चा रंगू लागली. अनेक वर्षे वेगवेगळ्या राजकीय वाटा चोखाळणारे उद्धव-राज ठाकरे आता मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एकत्र आले आहेत.
मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, नाशिक, पुणे आदी महापालिका एकत्र लढण्यावर उद्धव सेना व मनसे यांच्यात एकमत झाले असले तरी ठाकरे बंधूंच्या जागावाटपाचा कथित ‘गुप्त फॉर्म्युला’ चर्चेचा विषय ठरला आहे. जागावाटपाच्या फॉर्म्युल्यात दोन्ही भावांनी मात्र मराठी मतांचे एकत्रिकरण करण्यावर विशेष भर दिला आहे.
मुंबई महापालिका ही केवळ देशातील सर्वात श्रीमंत स्थानिक स्वराज्य संस्था नाही, तर मराठी अस्मितेचे राजकीय केंद्र मानली जाते. शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला असलेली मुंबई भाजपने काबीज करण्याचा प्रयत्न मागील काही वर्षांपासून तीव्र केला आहे. त्यातच भाजपच्या मदतीने तत्कालिन शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी तीन वर्षांपूर्वी केलेल्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे हे राजकीय मैदानात एकटे उरले होते. त्यानंतर महाविकास आघाडीतून लढताना उद्धव सेनेने लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळवले. मात्र, त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत अपयश पत्करावे लागले.
चर्चा झाली, निर्णय बाकी
मुंबईतील आरक्षण घोषित झाल्यानंतर सर्व वॉर्डांचे चित्र स्पष्ट झाले. 2017 मध्ये शिवसेना आणि मनसेने जिंकलेल्या जागा एकमेकांकडे ठेवताना काही ठिकाणी जागांची अदलाबदल केली जाणार आहे. यामध्ये ठाकरे गट 157 च्या आसपास, मनसे 65 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 15 ते 20 जागा देण्याची चर्चा आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या तरी कोणता पक्ष कोणत्या मतदारसंघातून लढणार, कोण किती जागा पदरात पाडून घेणार, हा फॉर्म्युला मात्र दोन्ही भावांनी गुप्त ठेवला आहे.
मतांचे गणित आणि सर्वेक्षण
ठाकरे बंधू एकत्र आल्याने संपूर्ण देशाचे लक्ष मुंबईकडे लागले आहे.
2017 च्या निवडणुकीत शिवसेना-मनसेची एकत्रित मतांची टक्केवारी 36 टक्के होती.
त्याच निवडणुकीत भाजपची मतांची टक्केवारी 27.5 टक्के इतकी होती.
2024 च्या विधानसभा निवडणुकीत मुंबईत भाजपला 29.2 टक्के मते मिळाली.
शिंदे शिवसेनेला 17.7 टक्के, उद्धव सेनेला 23.2 टक्के तर मनसेला 7.1 टक्के मते मिळाली.
या आकडेवारीनुसार ठाकरे बंधूंची एकत्रित मतांची टक्केवारी 30 टक्केपेक्षा जास्त जाऊ शकते.
या राजकीय गणिताच्या आधारेच ठाकरे बंधूंनी हातमिळवणी केल्याचे मानले जाते.
आघाडीच्या तयारीसाठी उद्धव सेना व मनसेने मुंबईतील सर्व 227 वॉर्डांचे सर्वेक्षण केले.