मुंबई : उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंची युती मुंबईपुरतीच होण्याची चिन्हे असून, त्यामुळे मात्र महाविकास आघाडी आणि ओघानेच इंडिया आघाडीत बिघाडीच्या शक्यतेने अस्वस्थता निर्माण झालेली दिसते. खुद्द ठाकरे गटाने ठाकरे बंधूंची युती हा इंडिया आघाडीचा विषयच नाही, असे सांगत आघाडीकडे पाठ फिरवण्याची पूर्ण तयारी उद्धव ठाकरे यांनी केल्याचे संकेत दिले आहेत.
इंडिया आघाडी ही लोकसभा निवडणुक आणि महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीसाठी निर्माण झाली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अशी कोणती आघाडी अजून निर्माण झालेली नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या युतीचा निर्णय हा इंडिया आघाडीचा विषय नाही. दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचा निर्णय घेतलेला असून ते समर्थ आहेत, अशी पक्षाची ठाम भूमिका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी शनिवारी मांडली.
राऊत यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीतील मित्रपक्ष कोणता निर्णय घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. तूर्त ठाकरेंचा मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी नागपुरात सावध प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, आगामी मनपा निवडणूक किंवा उद्धव ठाकरे - राज ठाकरे यांच्यातील युतीबाबत अजून चर्चा झालेली नाही. दोन भाऊ एकत्रित येणार म्हणून अनेकांच्या पोटात वेदना होत आहेत. अनेकांची झोप उडाली आहे. ते एकत्र आले तर आम्हाला आनंद आहे. आम्ही निर्णय घेऊ. अगोदर त्यांना एकत्र येऊद्या, असेही त्यांनी सांगितले.
ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्या संभाव्य युतीबाबत अधिकृत घोषणा झाली नसली तरी आगामी निवडणूकीपूर्वीच मुंबईत दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन झाल्याचे चित्र आहे. आतपर्यंत एकमेकांच्या विरोधात ठाकलेल्या शिवसेना ठाकरे गटाची बेस्ट कामगार सेना आणि मनसेची कामगार कर्मचारी सेना यांनी ’बेस्ट’ कामगार पतपेढी निवडणूकीत युती केली आहे. या निवडणूकीसाठी दोन्ही पक्षांनी ’उत्कर्ष पॅनल’ तयार करून निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. 21 जागांसाठी 18 ऑगस्ट रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणूकीसाठी दोन्ही पक्षांनी जागा वाटप केले आहे. जागावाटपात ठाकरे गट मोठा भाऊ ठरला असून ते 21 जागा लढणार असून राज ठाकरेंच्या कर्मचारी सेनेला अवघ्या दोन जागा मिळाल्या आहेत. या पतपेढीवर वर्चस्व दाखविण्यासाठी 11 जिंकणे आवश्यक असून ही निवडणूक जिंकल्यास आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूकीची ती नांदीच ठरणार असल्याने या निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बेस्ट कामगार पतपेढीच्या निवडणूकीत दोन्ही ठाकरेंचे पॅनेल एकत्र लढत आहेत. या युतीची राहुल गांधी यांना माहिती देण्यात आली होती काय, या प्रश्नावर राऊत म्हणाले, हा स्थानिक स्वराज्य संस्थांचा विषय आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरती राष्ट्रीय स्तरावर कधीच चर्चा होत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अशी कोणती आघाडी निर्माण झालेली नाही. प्रत्येक महानगरपालिका, जिल्हा परिषदेच्या क्षेत्रामध्ये स्थानिक आघाड्या निर्माण होत असतात, हा आतापर्यंतचा इतिहास आहे. त्यात राजकीय पक्ष अनेकदा नसतात. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत निर्णय घेण्याचे अधिकार त्या-त्या शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांना, पदाधिकार्यांना असतात. मुंबई हा विषय सगळ्यांपेक्षा वेगळा असल्याने याबाबत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे स्वतंत्र भूमिका घ्यायला समर्थ आहेत, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.
मनसे पक्षाची उद्धव ठाकरेंसोबत युती असेल की मनसे हा इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीचा घटक पक्ष असू शकेल, याबद्दल आपण काहीच सांगू शकत नाही. पण राजकारणात काही वेळेला काही गोष्टी स्विकाराव्या लागतात विंवा त्या कराव्या लागतात, असे सूचक विधान मनसे नेते बाळा नांदगांवकर यांनी शनिवारी केले.