मुंबई: शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) पेपर फुटल्याच्या निषेधार्थ मुंबई युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रविवारी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या शासकीय बंगल्यासमोर निदर्शने करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
भिवंडी येथे टीईटी पेपरफुटीच्या घटनेनंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यानंतर युवक काँग्रेसने रविवारी मंत्रालयासमोरील शिक्षणमंत्र्यांच्या बंगल्यासमोर आंदाेलन केले.
यावेळी युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांनी बंगल्याच्या सुरक्षा भिंतीवर ‘दादा भुसे राजीनामा द्या’ असे पोस्टर चिकटविले तसेच भुसेंच्या राजीनाम्यासाठी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ‘पेपरचोर गद्दीछोड’, ‘दादा भुसे राजीनामा द्या’, ‘विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ बंद करा’ अशा घोषणा दिल्या. आंदोलनकर्त्यांनी बंगल्यासमोरील परिसरात ‘पेपरचोर गद्दीछोड’ अशा घोषणा लिहून सरकारविरोधात संताप व्यक्त केला.
भाजप सरकारच्या काळात पेपरफुटी ही नित्याची बाब झाली आहे. नीटनंतर आता टीईटीचा परीक्षेचाही पेपर फुटल्याने लाखो विद्यार्थ्यांचे कष्ट, वेळ आणि भविष्य धोक्यात आले आहे. याची जबाबदारी स्वीकारून दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा. सरकारने निष्पक्ष चौकशी करून पेपरफुटीमागील संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी झीनत शबरीन यांनी यावेळी केली.