Namo Sahakari Taxi| ‘नमो सहकारी टॅक्सी’ योजना चालकांच्या हितासाठीच: प्रवीण दरेकर

म्हणाल तर माघार घेईन; मात्र चालकांच्या नुकसानाची जबाबदारी कोण घेणार? भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांचा सवाल
Namo Sahakari Taxi
Namo Sahakari TaxiPudhari
Published on
Updated on

मुंबई: राज्यात नव्याने सुरू होत असलेली योजना ‘नमो सहकारी टॅक्सी’म्हणून ओळखली जाईल, अशी घोषणा भाजपा गटनेते व मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी रविवारी केली.‘नमो सहकारी टॅक्सी’ योजना ही चालकांच्या हितासाठी आहे. यामध्ये कुठलाही स्वार्थ नाही.

माघार घेण्यास बोलले तर घेईन, मात्र खासगी कंपन्यांमुळे चालकांच्या होणाऱ्या नुकसानाची जबाबदारी कोण घेणार?, असा खडा सवालही दरेकरांनी उपस्थित केला आणि या योजनेवर करण्यात येत असलेले सर्व आरोप फेटाळले.

या संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत नमो सहकारी देवदत्त सहकारी संस्थेची वस्तुस्थिती दरेकर यांनी मांडली. ते म्हणाले, देवदत्त सहकारी संस्था ही वाहतूक व पर्यटन क्षेत्रात काम करण्यासाठी स्थापन झाली होती.

या संस्थेची रीतर नोंदणी झाल्याचे प्रमाणपत्रही आहे. राज्यातील बेरोजगार तरुणांना वाहतूक व पर्यटन क्षेत्रात सहकाराच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देणे हा संस्थेचा प्रमुख उद्देश आहे.

परंतु काही कारणास्तव ही संस्था मृतावस्थेत होती. हे समजल्यानंतर ती संस्था पुनर्जीवित करण्याचा मी प्रयत्न केला. या संस्थेच्या माध्यमातून टॅक्सीसेवा सुरू करण्याचा विचार केला. या उपक्रमात पहिल्या टप्प्यात ३ हजार टॅक्सी रस्त्यावर आल्या, तर प्रत्येकी २ हजार विशेषतः मराठी तरुण व ५० टक्के महिला चालकांना रोजगार मिळेल.

ओला, उबर, रॅपिडो या खासगी कंपन्या आहेत. त्यांच्या माध्यमातून चालकांचे रक्त शोषले जाते. ‘देवाभाऊ टॅक्सी’ नावावर कुणाचा आक्षेप असेल तर तेही बदलू.

उलट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘नमो सहकारी टॅक्सी’ हे नाव सुचवले आहे. ज्या चालकांना यात सहभागी करणार आहोत ते स्वतः या टॅक्सीसेवेचे भागीदार असतील. संस्थेचे ते शेअर होल्डर होतील. जो नफा कमावला जाईल त्याचे शेअरिंग चालकांना जाईल, असेही प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केले.

सभासद , सहकारी संस्थांना कर्ज देणे हे कुठल्याही बँकेचे धोरणच असते. मुंबई बँकेतही गाडी घेण्यासाठी कर्ज देण्याचे धोरण गेली अनेक वर्षे आहे.

आता फक्त या संस्थेच्या माध्यमातून जावे, कारण संस्थेला रेट ऑफ इंटरेस्ट कमी असतो, असा स्पष्ट उद्देश आहे. देवदत्त सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक झाली असून त्याचे पुरावेही आहेत, अशी वस्तुस्थिती दरेकरांनी अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांच्या संदर्भात स्पष्ट केली.

सहकार दिनी सहकारातील कार्यकर्त्यांचा होणार सन्मान

४ जुलै रोजी आंतरराष्ट्रीय सहकार दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रात सहकार चळवळीसाठी योगदान देणाऱ्या नेत्यांचा, कार्यकर्त्यांचा, संस्थांचा सन्मान पुरस्काराने होणार आहे. त्याकरिता राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार राज्यमंत्री, राज्याचे सहकार मंत्री, सहकार राज्यमंत्री, उद्योगमंत्री, सांस्कृतिक मंत्री यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या वतीने हा सोहळा यशवंतराव प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहितीही प्रवीण दरेकर यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news