Tardeo Housing Controversy Viral Video Pudhari
मुंबई

Mumbai Housing Row: ‘मांसाहारी असाल तर ताडदेवमध्ये घर नाही!’ व्हिडीओ व्हायरल; मनसेचा रिअल इस्टेट एजंटला इशारा, काय आहे प्रकरण?

Tardeo Housing Controversy Viral Video: ताडदेवमध्ये मांसाहार करणाऱ्या व्यक्तींना घर मिळणार नाही, असा दावा करणारा रिअल इस्टेट एजंट भावेश कावरेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Tardeo Housing Controversy Viral Video: मुंबईतील ताडदेव परिसरात मांसाहार करणाऱ्या व्यक्तींना घर मिळणार नाही, असा दावा करणाऱ्या रिअल इस्टेट एजंट भावेश कावरे याच्या कथित व्हिडीओवरून सोशल मीडियावर वाद निर्माण झाला आहे. या व्हिडीओमध्ये कावरे एका घराची माहिती देताना, ग्राहक मांसाहारी असल्यास ताडदेवमध्ये घर मिळणार नाही, तर शाकाहारी असल्यास घर मिळू शकते, असे म्हणताना दिसत आहे.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. एखाद्या व्यक्तीने काय खावं किंवा काय खाऊ नये, यावरून घर देण्याचा किंवा न देण्याचा निर्णय घेणे योग्य आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

‘मुंबईत कोणी काय खावं हे ठरवणारे तुम्ही कोण?’

या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना काही नेटकरी आक्रमक झाले आहेत. मुंबई ही मराठी माणसासोबतच आगरी-कोळी समाज, कष्टकरी वर्ग आणि विविध धर्म-समुदायांच्या लोकांची असल्याचे सांगत अशा प्रकारच्या अटींवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

विशेषतः मांसाहार करणाऱ्या व्यक्तींना केवळ त्यांच्या खाद्यपद्धतीमुळे घर नाकारले जावे का, असा सवाल सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

दरम्यान, अशा प्रकारच्या घरांच्या अटींबाबत मुंबईत यापूर्वीही वाद झाले आहेत. घाटकोपर, मुलुंड आणि इतर काही भागांमध्ये मांसाहारी नागरिकांना घर शोधताना अडचणी येत असल्याच्या तक्रारी वेळोवेळी समोर आल्या आहेत. त्यामुळे ताडदेवमधील या कथित व्हिडीओमुळे हा जुना वाद पुन्हा चर्चेत आला आहे.

मनसेचा आक्रमक पवित्रा

या प्रकरणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. संबंधित रिअल इस्टेट एजंटची भेट घेऊन ‘मनसे स्टाईलने समाचार घेऊ’, असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता राजकीय रंगही मिळाला आहे.

किशोरी पेडणेकरांचाही इशारा

या प्रकरणावर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ताडदेवमधील शिवसैनिक संबंधित ब्रोकरला जाब विचारतील, असा इशारा त्यांनी दिला.

बिल्डर किंवा काही विशिष्ट समुदायांच्या दबावाची भाषा आता ब्रोकरही करू लागले आहेत का, असा सवाल उपस्थित करत त्यांनी संबंधित व्यक्तीचा समाचार घेण्याची भूमिका मांडली.

आता या व्हिडीओनंतर संबंधित रिअल इस्टेट एजंटकडून काय स्पष्टीकरण दिले जाते आणि राजकीय पक्ष या प्रकरणात पुढे काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT