

Mumbai Real Estate Loans
मुंबई : घरांना असलेली वाढती मागणी, घरांच्या किमतीत झालेली वाढ, यामुळे महानगरातील कर्ज प्रकरणांत 10 आणि कर्ज रकमेत 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सरासरी गृहकर्जाचा आकार 74 लाख रुपयांवर गेला आहे. एकूण कर्जवितरणात एक कोटी आणि त्यावरील गृहकर्जाचे प्रमाण 21 टक्क्यांवर गेले आहे.
मुंबई, पुणे, नोएडा, बंगळुरू, गुरुग्राम, हैदराबादसह देशातील महानगरांमध्ये घरांना चांगली मागणी आहे. मुंबई आणि गुरुग्राममध्ये लक्झरी घरांची मागणी सर्वाधिक आहे. त्यामुळे आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये मुंबईतील गृहकर्जाचे सरासरी प्रमाण 99 लाख रुपयांवर गेले असून, गुरुग्राममधील गृहकर्जाचा आकार 88 लाखांवर गेला आहे. तसेच, या दोन शहरांतील 20 टक्के कर्ज एक कोटी रुपयांवरील आहे. अर्बन मनीच्या हाऊसिंग फायनान्स - द क्वाइट कॅटॅलिस्ट ड्रायव्हिंग इंडियाज प्रॉपर्टी मार्केट या अहवालात ही आकडेवारी देण्यात आली आहे.
आर्थिक वर्ष 2019 पासून घरांच्या किमतीत 55 ते 60 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे कर्जरकमेतही त्या प्रमाणात वाढ दिसून येत आहे. शहरी भागात प्रशस्त आणि लक्झरी घरांना वाढती मागणी आहे. आर्थिक वर्ष 2019 मध्ये देशभरात 3 लाख 7 हजार घरांची विक्री झाली होती. त्यात 2024-25 मध्ये 5.44 लाखांपर्यंत वाढ झाली आहे. केवळ सहा वर्षांत घरांची विक्री 77 टक्क्यांनी वाढली.
आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये वितरित झालेल्या एकूण गृहकर्जापैकी 21 टक्के कर्ज एक कोटी रुपयांवरील आहे. तर, 45 लाख रुपयांच्या आतील कर्जाचा टक्का 47 टक्के असून, 45 लाख ते एक कोटी यादरम्यान मंजूर झालेल्या कर्जाचा टक्का 32 आहे. एकूण गृहकर्जातील 20 टक्के गृहकर्ज महिलांच्या नावावर आहे. महिलांच्या नावावर असलेले सरासरी कर्ज 70 लाख रुपये आहे.
शहर सरासरी कर्ज वाढ %
बंगळुरू 74 9
गुरुग्राम 88 7
नोएडा 71 4
हैदराबाद 69 4
मुंबई 99 4
ठाणे 68 14
नवी मुंबई 76 12
पुणे 59 8