Sunil Tatkare Pudhari
मुंबई

Sunil Tatkare : राष्ट्रवादी विलीनीकरण चर्चेची कवाडे आमच्याकडूनही बंद

जयंत पाटील यांची भेट आणि अर्थ खात्याची चर्चा निराधार : तटकरे

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा अजित पवार करत होते. आता त्यांच्या दुर्दैवी निधनानंतर अशाप्रकारच्या चर्चेची कवाडे शरद पवार गटाप्रमाणे आम्हीही बंद केली आहेत. तसेच, ‘वर्षा’ निवासस्थानी जयंत पाटील यांची भेट आणि त्यांना अर्थ खाते देण्याबाबतच्या चर्चा निराधार आहेत, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी केला. ते पक्ष कार्यालयात माध्यमांशी बोलत होते.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. अजित पवार यांच्याप्रमाणे त्यांच्याशीही चांगला संवाद आहे. तसेच, अजित पवार हयात असताना विलीनीकरणाच्या चर्चा अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचल्याही होत्या. त्या सर्व चर्चा मला माहीत होत्या; पण दुर्दैवाने त्यांचे निधन झाल्यावर विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचे तटकरे म्हणाले.

काही दिवसांपूर्वी शरद पवार गटाच्या राज्यपातळीवरील बैठकीत कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पक्षाच्या विलीनीकरण विषयाला पूर्णविराम दिला आहे, अशी भूमिका मांडली होती. त्यामुळे नव्याने चर्चा सुरू झालेली नाही. आता ज्या भूमिकेची अजून कुठे सुरुवातच झाली नाही, त्याबद्दल प्रतिक्रिया देण्याचे कारणच नाही, असे तटकरे यांनी स्पष्ट केले.

हा केवळ योगायोग

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी झालेल्या भेटीचे कारण जयंत पाटील यांनी सांगितले आहे. ते त्यांच्या मतदारसंघातील कामाबद्दल भेटले होते आणि आपणसुद्धा आपल्या मतदारसंघातील कामाबद्दल मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो. आमच्या पक्षाचे नेते प्रफुल्‍ल पटेल यांना मध्यरात्री बाहेर जायचे असल्याने तेही तेथे आले होते. त्यांचे विषय त्यांनी मांडले. हा योगायोग होता, असे तटकरे म्हणाले.

अर्थ खात्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार

सोमवारपासून संसदेचे अधिवेशन सुरू होत आहे. आपण, प्रफुल्‍ल पटेल आणि पार्थ पवार तेथे भेटणार असून राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत आलेल्या नोटीसबाबत सविस्तर चर्चा करणार आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या अर्थ खात्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही तटकरे म्हणाले.

राष्ट्रवादी पक्षांतर्गत मोठा कट ; सुनेत्रा पवारांना सावध राहण्याचा अंजली दमानियांचा सल्ला

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत मोठा कट रचला जात असून या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सावध राहावे, असा सल्ला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिला आहे.

राष्ट्रवादीच्या दोन ज्‍येष्‍ठ नेत्यांच्या हालचालींकडे बारकाईने पाहण्याची आवश्यकता आहे. सध्या ज्या घडामोडी सुरू आहेत, त्यावरून पक्षांतर्गत काहीतरी मोठा कट रचला जात असल्याचे दिसत आहे. पक्षातील एका व्यक्तीने निवडणूक आयोगाकडे पत्र पाठवून पक्षातील झालेली निवडणूक बेकायदेशीर असल्याचा दावा केला आहे. या घडामोडी स्वतंत्र नसून त्यामागे नियोजनबद्ध रणनीती असावी, अशी शक्यताही दमानिया यांनी व्यक्त केली.

सुनेत्रा पवार या सक्रिय राजकारणात तुलनेने नव्या असल्यामुळे त्यांना या घडामोडींची पूर्ण कल्पना नसावी. त्यामुळे त्यांच्याविरोधात कोणत्या प्रकारचे राजकीय डावपेच रचले जाऊ शकतात, याचा अंदाज त्यांना येत नसल्याचे दिसते, असे दमानिया म्हणाल्या.

अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त पक्षातील आमदार आणि पदाधिकाऱ्यांना केवळ अजित पवार यांचेच छायाचित्र बॅनरवर लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यावरून पक्षावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT