मुंबई : दिलीप सपाटे
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार, हे आता स्पष्ट झाले आहे. अजित पवारांना जाऊन दोन दिवस झाले नाहीत तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नेता निवडीचा घेतलेला निर्णय पाहता एवढी घाई का? असा प्रश्न विचारला जात आहे; पण ज्या जलदगतीने हा निर्णय घेण्यात आला, ते पाहता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांनी शरद पवार गटाला पुढील हालचाली करायला संधी दिलेली नाही.
दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची चर्चा महापालिका निवडणुकीआधीपासून सुरू आहे. पडद्यामागे त्यासाठी हालचाली सुरू होत्या. मात्र, अजित पवारांच्या निधनानंतर ही चर्चा जास्त जोरात सुरू झाली आहे. जिल्हा परिषद निवडणुका होताच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण केले जाणार, असे सांगितले जात आहे. त्यामध्ये शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे नेते आघाडीवर आहेत.
माजी मंत्री जयंत पाटील, राजेश टोपे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, प्रवक्ते अंकुश काकडे त्यामध्ये आघाडीवर आहेत; पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडील प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आदी बड्या नेत्यांनी त्याबाबत उघड भूमिका घेतलेली नाही. राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी विलीनीकरणावर आक्रमक भूमिका घेण्यामागे त्यांना सत्तेत भागीदारी मिळण्याची शक्यताही खुणावत आहे. स्वतः शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची भूमिका अजून स्पष्ट झालेली नाही.
राष्ट्रवादीची दोन मंत्रिपदे रिक्त आहेत. विलीनीकरण झाल्यास शरद पवार गटाच्या नेत्यांनाही मंत्रिमंडळात स्थान द्यावे लागू शकते. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या नेत्यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर दोन दिवस होतात की नाही तोवर उपमुख्यमंत्रिपदाची निवड आणि अन्य मंत्रिपदांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करत झटपट निर्णय घेतले आहेत. त्यामुळे त्यांनी विलीनीकरण होण्याआधी मंत्रिमंडळातील जागा व्यापण्याची भूमिका घेतली आहे.
सुनेत्रा पवारांपुढे दुःख विसरून कुटुंब, पक्ष सावरण्याचे आव्हान
अजित पवार यांना जाऊन अवघे तीन दिवस झाले असताना आपला दुःखाचा डोंगर मागे सारून कुटुंबाला आणि पक्षाला सावरण्याचे मोठे आव्हान खासदार सुनेत्रा पवार यांना पेलावे लागणार आहे. सुनेत्रा पवार यांची शनिवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या बैठकीत नेतेपदी निवड होणार आहे. या निवडीनंतर राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्या शपथ घेतील. अजितदादांना गमावण्याचे डोंगराएवढे दुःख त्यांच्यापुढे असताना त्यांना या नव्या जबाबदारीचे आव्हान पेलावे लागणार आहे.
अजित पवारांच्या जाण्याने अवघे पवार कुटुंब कोसळून गेले आहे. त्यांची दोन्ही मुले राजकारणात अजून नवखी असल्याने त्यांना पुढे करण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या नेत्यांना घ्यावा लागला आहे. त्यासाठी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रिपद सांभाळण्यासाठी राजी करण्यात आले आहे. अजित पवारांप्रमाणेच सुनेत्रा पवार या खंबीर वृत्तीच्या आहेत.
बारामती मतदारसंघ आणि त्यांच्या संस्थांमध्ये त्या कार्यरत आहेत. तसेच, त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी आहेत. जिल्हा परिषद निवडणुका झाल्यानंतर पुढे लोकसभा निवडणुकीपर्यंत कोणत्याही निवडणुका नसल्या, तरी त्यांना पक्षाची घडी बसवून पक्षाला पुढे नेण्याचे काम करावे लागणार आहे. सोबतच, सरकारमध्येही आपला दबदबा ठेवावा लागणार आहे.