मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक अखेर जाहीर झाले आहे. बारावीची परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीत तर दहावीची परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 दरम्यान घेण्यात येणार आहे.
राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागांतर्गत या परीक्षा आयोजित केल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करता यावे, म्हणून मागील काही वर्षांपासून जुलै किंवा ऑगस्ट महिन्यातच वेळापत्रक जाहीर केले जात होते. मात्र यंदा ते दोन महिने उशिरा, म्हणजेच 13 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आले आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही बारावीची परीक्षा फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात आणि दहावीची परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. परीक्षांचा ऑनलाईन निकाल मेअखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात घोषित केला जाईल. त्यानंतर अपयशी तसेच श्रेणीसुधारासाठी इच्छुक विद्यार्थ्यांसाठी जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात पुरवणी परीक्षा घेण्यात येते.
राज्य मंडळाने यंदा परीक्षेचा कालावधी थोडा पुढे आणण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षा नेहमीपेक्षा 8 ते 10 दिवस आधी संपवण्याचा मानस असून, दोन्ही परीक्षांचा शेवट 18 मार्चपूर्वी करण्याची तयारी सुरू आहे. यामुळे पुढील शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया आणि विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा वेळेवर पार पाडण्यासाठी मंडळाने तयारी केली आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आणि पुढील टप्प्यांसाठी पुरेसा वेळ मिळावा, यासाठी प्रात्यक्षिक, तोंडी आणि लेखी परीक्षांच्या तारखा समायोजित करण्यात आल्या आहेत.
बारावीचे लेखी, प्रात्यक्षिक
लेखी परीक्षा : 10 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026
प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन : 23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी
दहावीचे वेळापत्रक
लेखी परीक्षा : 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026
प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन : 2 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी