100-Day Campaign
मुंबई : १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याचा निकाल शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला असून, सर्व महामंडळांमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने अव्वल क्रमांक पटकावला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा कारभार स्वीकारल्यानंतर प्रशासनाला शंभर दिवसांचा कृती आराखडा दिला. शासकीय कार्यालयांना शिस्त लावणे, सेवांचे सुसूत्रीकरण हा उद्देश त्यामागे होता. पहिल्या टप्प्यात मंत्रालयीन विभागांचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यात महिला व बालकल्याण विभाग प्रथम आला होता. त्याखालोखाल सार्व. बांधकाम विभाग, कृषी, ग्रामविकास, परिवहन व बंदरे या खात्यांनी क्रमांक पटकावले.
दुसऱ्या टप्प्यात संकेतस्थळात सुधारणा, कार्यालयीन सोईसुविधा, स्वच्छता, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी १० मुद्द्यांवर शासकीय कार्यालयांमध्ये घेतलेल्या स्पर्धेत सर्व ९५ महामंडळांनी सहभाग घेतला व त्यांपैकी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने ८२.१६ गुण पटकावून पहिला क्रमांक पटकावला आहे.
पहिल्या पाच महामंडळांमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळानेही स्थान पटकावले आहे. शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात सर्व ३५८ तालुक्यांतील १० हजार शासकीय कार्यालयांनी कौतुकास्पद कामगिरी केल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व शासकीय विभागांच्या प्रत्येक महसुली विभागातील उत्कृष्ट ३ तालुका कार्यालयांची निवड जाहीर केली.
दरम्यान, प्रत्येक शासकीय विभागाची विभागीय स्तरावरील कार्यालये व जिल्हा स्तरावरील कार्यालये यांच्या स्पर्धेचा निकाल २३ मे रोजी जाहीर केला जाणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सर्वोत्तम कामगिरी करणारी महामंडळे
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण
८२.१६ गुण
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित
७७.१९ गुण
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण
७६.०२ गुण
महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण
६६.३७ गुण
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ
६५.१४ गुण