Dharavi Redevelopment Eligibility Camp Pudhari
मुंबई

Dharavi Redevelopment Eligibility Camp: झोपु शिबिरात अनिर्णित पात्रतेचा जागेवर फैसला अन्‌‍ खुलासा

धारावी सेक्टर-3 च्या पात्रता शिबिराला धारावीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या ज्या झोपडीधारकांना परिशिष्ट - 2 मध्ये अनिर्णीत घोषित करण्यात आले होते, अशा नागरिकांसाठी झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाने सोमवारी येथील शेड कॉम्प्लेक्स मध्ये दिवसभराचे पात्रता शिबिर आयोजित केले.

585 झोपडीधारकांनी शिबिराला भेट देऊन अधिकाऱ्यांशी थेट चर्चा आणि माहिती घेऊन आपल्या घराची अनिर्णीत पात्रतेची विविध कारणे जाणून घेतली. त्यापैकी अनेकांचे प्रश्न जागच्या जागी सोडविण्यास मदत झाली. कागदपत्रे सादर केलेल्या बहुतांश झोपडीधारकांना या शिबिरामुळे पात्रतेची स्पष्टता मिळाली.

धारावी पुनर्विकास प्रकल्पातील प्रत्येक पात्र झोपडीधारकाला त्याचा हक्क मिळावा आणि प्रशासकीय प्रक्रियेतील त्रुटींमुळे कोणावरही अन्याय होऊ नये, यासाठी ‌‘झोपुप्रा प्रशासन थेट धारावीकरांच्या दारी‌’ आले आहे.

धारावी अधिसूचित क्षेत्रामधील ‌‘परिशिष्ट-2‌’ मध्ये अनिर्णित (पेंडिंग) घोषित केलेल्या झोपडीधारकांचे प्रलंबित प्रश्न थेट जागेवरच निकाली काढले जाणार आहेत. यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण धारावी भागात सेक्टरनिहाय समक्ष जागेवर तक्रार निवारण शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.

धारावी पुनर्विकास प्रकल्पात परिशिष्ट - 2 मध्ये अनिर्णीत घोषित केलेल्या झोपडीधारकांची प्रकरणे रखडली होती. त्यातील त्रुटी दुरुस्त करून ही प्रकरणे मार्गी लावण्यासाठी झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी धारावी सेक्टर- 3 मध्ये झोन 8,9,10.14.15 आणि 16 मधील नागरिकांसाठी पात्रता शिबिर संपन्न झाले.

धारावी सेक्टर 3 मध्ये जवळपास 67 चाळी आहेत. येथील 700 ते 800 रहिवाशांनी प्रत्यक्ष शिबिराला भेट देऊन शिबीर अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. त्यामध्ये अनिर्णीत पात्रता असलेच्या 585 झोपडीधारकांनी अधिकाऱ्यांशी थेट चर्चा आणि माहिती घेत आपल्या घराच्या अनिर्णीत पात्रतेची कारणे जाणून घेतली. तसेच योग्य कागदपत्रे सादर करून अर्ज सादर केले. त्यामुळे अनेकांचे अर्ज निकाली लागण्याचा मार्ग या शिबिरामुळे मोकळा झाला.

पुढील टप्प्यात, धारावी डेपो रोडवरील आंबेडकर नगर येथील म्हाडा इमारत क्रमांक 5 (पीएमजीपी कॉलनी) येथे दोन विशेष शिबिरे होतील. यामध्ये 20 आणि 21 मे रोजी सेक्टर 4 मधील झोन 17, 18, 19, 23, 24 आणि 28 साठी, तर 21 आणि 22 मे रोजी सेक्टर 5 मधील झोन 25, 26, 27, 31, 32, 33 आणि 34 च्या झोपडीधारकांसाठी कामकाज चालेल. या मोहिमेचा शेवटचा टप्पा 25 आणि 26 मे रोजी माटुंगा पूर्व येथील पिंजरा हॉलमध्ये पार पडेल, जिथे सेक्टर 1 मधील उर्वरित झोन 1, 3, 4, 5 आणि 6 च्या नागरिकांच्या अडचणींचे निवारण केले जाईल.

  • ज्या झोपडीधारकांची हस्तांतरणाच्या कारणाने परिशिष्ट - 2 मधील पात्रता सिद्ध झालेली नव्हती, त्यांची आवश्यक कागदपत्रे किंवा हस्तांतरण पावती पडताळणी करून शाश्वती म्हणून पत्र देण्यात आली.

  • ज्या झोपडीधारकांचा घराचा सर्व्हे करायचा राहून गेला आहे, त्याची कारणे पडताळून अर्ज स्वीकारण्यात आले. अर्जानंतर त्यांचा एक महिन्यात सर्व्हे केला जाणार आहे.

  • सेक्टर - 3 मध्ये शिबिराला भेट देऊन अधिकाऱ्यांशी चर्चा आणि माहिती घेऊन 585 झोपडीधारकांनी अर्ज केले. त्यापैकी 165 अर्ज कागदपत्र पडताळणी करून पात्र होणार आहेत. तसेच 33 अर्ज ट्रान्सफर फी संदर्भात मार्गी लागणार आहेत. आणि 51 घरांवर आता घर नंबर टाकण्यासाठी योग्य कागदपत्रांची पूर्तता झाली आहे. त्यामुळे या पात्रता शिबिरात जवळपास 50 टक्के झोपडीधारकांना पात्रतेची शाश्वती मिळाली असल्याची माहिती शिबिरातील वरिष्ठ व्यवस्थापक विद्याधर मिरजकर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT