मुंबई : चंदन शिरवाळे
दक्षिण-मध्य मुंबईत यंदाची महानगरपालिका निवडणूक थेट उद्धव सेना विरुद्ध शिंदे सेना अशी आहे. शिवसेना फुटीमुळे या भागात पारंपरिक राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. मनसेसह दोन्ही सेनांनी आपली ताकद लावल्यामुळे या भागांमध्ये प्रचाराला वेग आला आहे.
दक्षिण-मध्य मुंबईत सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी अनुशक्तीनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) सना मलिक, धारावीत काँग्रेसच्या डॉ. ज्योती गायकवाड, सायन कोळीवाडामध्ये भाजपचे कॅप्टन सेलवीन, तर वडाळामध्ये कालिदास कोळंबकर आणि माहीममध्ये उद्धव सेनेचे महेश सावंत व चेंबूरमध्ये प्रकाश फातर्फेकर हे आमदार आहेत. या क्षेत्रात एकूण महापालिकांचे 36 वॉर्ड आहेत. मात्र, मागील तीन वर्षांपासून निवडणूक झाली नाही. त्यामुळे या नगराचा कारभार प्रशासक हाकत आहे. साहजिकच सर्वसामान्यांच्या वॉटर-मीटरसारख्या समस्या आमदारांमार्फत सोडविल्या जात आहेत. साहजिकच आमदारांचे कर्तृत्व आणि संपर्क नगरसेवकांना निवडून आणण्यास जमेची बाजू ठरणार आहे.
उद्धव सेनेची मराठी अस्मिता, ठाकरे ब्रँड आणि जुन्या नगरसेवकांचे नेटवर्क येथे आहे. सोबतीला शिवसेना शाखा, स्थानिक कार्यकर्त्यांचीही मजबूत यंत्रणा असून, गिरणी कामगार, जुन्या चाळीतील मतदारांचा पाठिंबा मिळत आहे. मनसे मराठी मतांचे विभाजन करणारा घटक समजला जात होता. आता तोही सोबत असल्यामुळे उद्धव सेना जोमाने प्रचार करत आहे.
मिलिंद वैद्य (उबाठा) - राजन पारकर (भाजप)
वैशाली शेवाळे (शिंदे सेना) - पारूबाई कटके (मनसे)
रवी राजा (भाजप) - टी. एम. जगदीश (उबाठा)
मंगला गायकवाड (भाजप) - हर्षीला मोरे (उबाठा )
शीतल गंभीर (भाजप) - वैशाली पाटणकर (उबाठा )
विशाखा राऊत (उबाठा) - प्रिया सरवणकर गुरव (शिंदे सेना)
यशवंत किल्लेदार (मनसे) - प्रीती पाटणकर (शिंदे सेना)
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्तेतील सहभाग आणि विकासकामांचा मुद्दा पक्षासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. माजी नगरसेवकांची साथसुद्धा शिंदे सेनेसाठी जमेची बाजू आहे. या क्षेत्रात भाजपची काही वॉर्डात स्वतंत्र ताकद आहे. युतीमुळे ही ताकद शिंदे गटासोबत राहू शकेल. या मतदारसंघातील काही भागात झोपडपट्टी आहेत; पण मध्यमवर्ग आणि व्यापारी मतदारांची संख्यासुद्धा लक्षवेधी आहे. काँग्रेस स्वबळावर असल्यामुळे झोपडपट्टी भागातील मते काँग्रेसला जाण्याची चर्चा आहे.