Sooraj Pancholi Disha Salian Case Pudhari
मुंबई

Sooraj Pancholi Disha Salian Case: दिशा सालियान प्रकरणात सूरज पंचोलीचा मोठा खुलासा; आदित्य ठाकरेंच नाव घेत म्हणाला, 'माझ्याकडे...'

Sooraj Pancholi Disha Salian Case: दिशा सालियान मृत्यू प्रकरणात नाव चर्चेत आल्यानंतर अभिनेता सूरज पंचोलीने अखेर मौन सोडलं आहे.

Rahul Shelke

Sooraj Pancholi Disha Salian Case: दिशा सालियान मृत्यू प्रकरणात अभिनेता सूरज पंचोलीचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) या प्रकरणात FIR दाखल केल्यानंतर सूरज पंचोलीने सोशल मीडियावर एक सविस्तर निवेदन देत त्याच्यावर होत असलेल्या आरोपांवर भाष्य केलं आहे. दिशा सालियान किंवा शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे यांची आपण कधीही भेट घेतलेली नाही, असा स्पष्ट दावा सूरजने केला आहे.

गेल्या काही वर्षांपासून दिशा सालियानच्या मृत्यूशी संबंधित विविध मीडिया रिपोर्ट्स आणि वक्तव्यांमधून आपलं नाव या प्रकरणाशी जोडण्यात येत असल्याचं सूरजने म्हटलं. त्यामुळे या प्रकरणातील काही तथ्यं सार्वजनिकपणे स्पष्ट करणं गरजेचं वाटल्याने आपण आता बोलत असल्याचं त्याने सांगितलं.

‘दिशा सालियानला मी आयुष्यात कधीही भेटलो नाही’

आपल्या निवेदनात सूरज पंचोलीने अत्यंत स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली. त्याने म्हटलं, “मला हे अगदी स्पष्टपणे सांगायचं आहे. मी दिवंगत दिशा सालियानला माझ्या आयुष्यात कधीही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे भेटलेलो नाही. त्याचप्रमाणे आदित्य ठाकरे यांनाही मी कधीही भेटलेलो नाही.” गेल्या अनेक वर्षांपासून विविध चर्चांमध्ये आणि माध्यमांतील वृत्तांमध्ये आपलं नाव या प्रकरणाशी जोडण्यात आल्याने आपण अस्वस्थ झाल्याचंही सूरजने म्हटलं.

CBI आणि पोलिसांनी आधीच चौकशी केल्याचा दावा

सूरज पंचोलीने आपल्या निवेदनात तपास यंत्रणांकडून झालेल्या चौकशीचाही उल्लेख केला आहे. आपल्या म्हणण्यानुसार, CBI आणि पोलिसांनी काही वर्षांपूर्वीच त्याची चौकशी केली होती आणि त्याचा जबाबही नोंदवण्यात आला होता.

“माझ्याकडे लपवण्यासारखं काहीही नाही,” असं म्हणत सूरजने तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. भविष्यात अधिक माहितीची आवश्यकता भासल्यास किंवा पुन्हा चौकशी करायची असल्यास आपण त्यासाठी तयार असल्याचंही त्याने स्पष्ट केलं.

‘पुराव्याशिवाय माझं नाव जोडणं अन्यायकारक’

आपल्याविरोधात कोणताही ठोस पुरावा नसताना वारंवार दिशा सालियान प्रकरणाशी नाव जोडणं हे “अन्यायकारक आणि त्रासदायक” असल्याचं सूरजने म्हटलं.

गेल्या काही वर्षांत आपल्याबद्दल अनेक बातम्या आणि दावे करण्यात आले, मात्र प्रत्येक बातमीवर प्रतिक्रिया देणं आपण टाळलं. परंतु आपलं नाव सातत्याने या प्रकरणाशी जोडले जात असल्याने आता आपली बाजू सार्वजनिकपणे मांडण्याची वेळ आली असल्याचं त्याने सांगितलं.

सूरजने तपास यंत्रणांना या प्रकरणाशी संबंधित खोट्या माहितीची चौकशी करण्याचं आवाहनही केलं. एका व्यक्तीच्या मृत्यूचा आधार घेऊन दुसऱ्या व्यक्तीची प्रतिमा कोणत्याही पुराव्याशिवाय खराब करणं योग्य नसल्याचं त्याने सांगितलं.

‘हेडलाईन म्हणजे पुरावा नाही’

आपल्या निवेदनाच्या शेवटी सूरज पंचोलीने माध्यमांमध्ये होणाऱ्या चर्चांवरही भाष्य केलं. “हेडलाईन म्हणजे पुरावा नाही. चर्चा म्हणजे पुरावा नाही,” असं तो म्हणाला.

कायद्यावर आणि तपास यंत्रणांवर आपला विश्वास असल्याचं सांगत सत्य अखेर समोर येईल, असा विश्वास सूरजने व्यक्त केला आहे. दिशा सालियान प्रकरणातील तपासाच्या पार्श्वभूमीवर त्याच्या या वक्तव्यामुळे या प्रकरणातील चर्चेला पुन्हा एकदा वेगळं वळण मिळालं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT