मुंबई: गुजरातचा गुंड सोहराबुद्दीन शेखच्या 2005 मधील कथित बनावट चकमकीच्या प्रकरणातील 21 पोलिसांसह 22 आरोपींची निर्दोष मुक्तता करताना तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले.
सोहराबुद्दीन आणि त्याची पत्नी कौसरबी तसेच त्यांचा सहकारी तुळसीराम प्रजापती यांना गुजरात आणि राजस्थान पोलिसांनी बेकायदेशीरपणे पकडून फार्म हाऊसवर ठेवलेला घटनाक्रम कुठेही जुळत नाही. राजकीय नेत्यांना या प्रकरणात अडकवण्यासाठी हे तयार करण्यात आलेले कथानक होते. अशी टिपणी मुंबई उच्च न्यायालयाने हा निकाल देताना केली.
मुंबई उच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने सोहराबुद्दीन शेखचे भाऊ, रुबाबुद्दीन शेख आणि नयमुद्दीन शेख यांनी दाखल केलेली अपीले फेटाळून लावली. या अपीलांमध्ये गुजरात आणि राजस्थानमधील 22 पोलीस कर्मचाऱ्यांची निर्दोष मुक्तता करणाऱ्या 21 डिसेंबर 2018 च्या सत्र न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देण्यात आले होते.
नोव्हेंबर 2005 मध्ये सोहराबुद्दीन शेख यांची झालेली कथित हत्या, त्यांची पत्नी कौसर बी यांचे बेपत्ता होणे आणि त्यानंतर डिसेंबर 2006 मध्ये तुळशीराम प्रजापती यांचा झालेला मृत्यू, या घटनांशी संबंधित आहे.
फिर्यादी पक्षाच्या म्हणण्यानुसार, पोलीस अधिकारी आणि राजकारण्यांचा कथित सहभाग असलेल्या एका गुन्हेगारी कटाचा भाग म्हणून, या तिघांचे झहिराबादजवळ एका आलिशान बसमधून अपहरण करण्यात आले आणि नंतर बनावट चकमकींमध्ये त्यांची हत्या करण्यात आली.
खंडपीठाने नमूद केले की, फिर्यादी पक्षाने 210 साक्षीदारांची तपासणी केली, त्यापैकी 92 जण फितूर झाले. 92 साक्षीदार फितूर झाले म्हणून खटला योग्यरित्या चालला नाही असा निष्कर्ष काढायला कोणताही आधार नाही. फिर्यादी पक्षाने उलटतपासणी केली असता, या साक्षीदारांनी फिर्यादी पक्षाच्या बाजूने पोलिसांना कोणतेही निवेदन दिल्याचे नाकारले, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
सोहराबुद्दीन शेख, कौसर बी आणि तुळशीराम प्रजापती यांचे अपहरण करणारे आरोपी हेच होते, हे एकाही साक्षीदाराला ओळखता आले नाही. कटाच्या गुन्ह्याचे सार म्हणजे करारानुसार एकत्र येणे. या कराराच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीबाबत काही पुरावा असणे आवश्यक आहे. केवळ विचारांचे आदानप्रदान किंवा बेकायदेशीर कृत्य करण्याची इच्छा असणे पुरेसे नाही,” असे न्यायालयाने म्हटले.
न्यायालयाची निरीक्षणे
सोहराबुद्दीनच्या मांडीत आढळलेली बंदुकीची गोळी आणि सादर केलेली बंदुक यात कोणताही संबंध आढळला नाही
ही बंदुक कुणाला देण्यात आली होती त्याची नोंद नाही
तुळसीराम प्रजापती याला बनावट चकमकीत ठार मारण्यात आले, याचा कोणताही पुरावा नाही
22 जानेवारी 2005 रोजी एका अलिशान बसमधून प्रवास करणारे सोहराबुद्दीन शेख, कौसरबी आणि तुळसीराम प्रजापती होते हे सिद्घ करणारा कोणताही पुरावा तपास यंत्रणेने सादर केलेला नाही
या खटल्यातून निर्दोष मुक्त झालेले गुजरात आणि राजस्थानचे पोलीस अधिकारी, कर्मचारी
आशिष पांड्या, घट्टामानेनी एस. राव, बाळकृष्ण चौबे, रमणभाई के. पटेल, अजयकुमार परमार, संतराम शर्मा, युधवीर सिंग , कर्तार सिंग, नारायणसिंग चौहान, जेठासिंग सोलंकी, कांजिभाई कुतची, विनोदकुमार लिंबाचिया, किरणसिंग चौहान, करणसिंग सिसोदिया, एम. एल. परमार, एन. एच. ढाबी, नरेश चौहान, विजयकुमार राठोड, अब्दुल रेहमान, हिमांशुसिंग राजावत, शामसिंग चरन, (यातील 22 वा आरोपी हा फार्महाऊसचा मालक राजेंद्र जीरावाला यालादेखील निर्दोष मुक्त करण्यात आले.)
बनावट चकमकीची शक्यता नाकारली
सोहराबुद्दीन शेख यांचे शवविच्छेदन करणारे डॉक्टर धर्मेश सोमाभाई पटेल यांची साक्ष न्यायालयाने नोंदवली. यावेळी डॉक्टरांनी सांगितले की, मृतदेहावर भाजल्याच्या खुणा किंवा धुराचे अवशेष आढळले नाहीत, जे साधारणपणे एखाद्या व्यक्तीवर जवळून गोळीबार झाल्यास आढळतात.
शवविच्छेदन अहवालात असेही नमूद केले आहे की, मृतदेहाच्या स्नायूंमध्ये आकुंचन आढळले नाही, जे सामान्यतः अत्यंत शारीरिक किंवा भावनिक तणावामुळे मृत्यू झाल्यास होते. या निष्कर्षांवरून सोहराबुद्दीन शेख यांच्या बनावट चकमकीची कोणतीही शक्यता स्पष्टपणे नाकारली जाते, असे खंडपीठाने आपल्या निकालात म्हटले.
तुलसीराम प्रजापती यांच्या मृत्यूबाबत, न्यायालयाने नमूद केले की, फिर्यादी पक्षाने खून पाहणारा कोणताही साक्षीदार सादर केला नाही. कौसर बी यांच्या बाबतीत, फिर्यादी पक्षाने दावा केला होता की त्यांना जाळून ठार मारण्यात आले आणि त्यांचे अवशेष नर्मदा नदीत टाकण्यात आले. न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की, हे सिद्ध करण्यासाठी सादर केलेल्या बहुतेक साक्षीदारांनी फिर्यादी पक्षाच्या दाव्याला दुजोरा दिला नाही.
तपास अधिकाऱ्याने सत्र न्यायालयासमोर सांगितले होते की, कोणत्याही आरोपीला राजकीय किंवा आर्थिक लाभ मिळाल्याचे दर्शवणारा कोणताही पुरावा नाही. तसेच खटल्याला सामोरे जाणारे पोलीस अधिकारी त्यांच्या वरिष्ठांच्या निर्देशांनुसार काम करत होते.
न्यायालयाने अपीलकर्ते, रुबाबुद्दीन आणि नयमुद्दीन शेख यांच्या साक्षीचाही संदर्भ घेतला. रुबाबुद्दीन यांनी उलटतपासणीत कबूल केले की, त्यांनी एका चौकशी समितीला सांगितले होते की, सोहराबुद्दीन आणि कौसर बी यांच्यासोबत तुळशीराम प्रजापती नव्हे, तर कलिमुद्दीन नावाची व्यक्ती प्रवास करत होती. नयमुद्दीन यांनी सांगितले की, त्यांची साक्ष कलिमुद्दीन यांनी दिलेल्या माहितीवर आधारित होती, ज्यांची तपासणी झाली नव्हती.