Siddhivinayak Temple Income 2026 Pudhari
मुंबई

Siddhivinayak Temple Income 2026: सिद्धिविनायक न्यासाचे उत्पन्न विक्रमी 182 कोटींवर! गतवर्षीच्या तुलनेत 35 टक्क्यांनी वाढ

समाजाभिमुख अर्थसंकल्प जाहीर

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: भाविकांनी अर्पण केलेल्या अमूल्य देणग्यांमुळे श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या उत्पन्नात यंदा लक्षणीय वाढ झाली असून, या आर्थिक बळावर सन 2026-27 चा समाजाभिमुख अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला आहे.

गेल्या आर्थिक वर्षात न्यासाचे उत्पन्न विक्रमी 182 कोटी रुपयांवर पोहोचले असून, तब्बल 35 टक्यांनी वाढ झाली आहे. या वाढीचा थेट फायदा विविध सामाजिक योजनांना आणखी बळ देण्याचा निर्धार विश्वस्त समितीने व्यक्त केला आहे.

न्यासाचे अध्यक्ष(राज्यमंत्री दर्जा)सदानंद सरवणकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विश्वस्त समितीच्या बैठकीत बैठकीत अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. कार्यकारी अधिकारी वीणा पाटील यांनी आगामी वर्षाचा अंदाजपत्रक सादर करताना उत्पन्नातील वाढ आणि त्यानुसार न्यासाने आखलेले खर्चाचे नियोजनाची माहिती दिली.

न्यासाने सन 2025-26 या वर्षासाठी 155 कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित धरले होते; मात्र प्रत्यक्षात उत्पन्न 182 कोटी रुपयांपर्यंत पोहचले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत सुमारे 35 टक्क्यांची वाढ झाली असून भाविकांच्या देणगीतून मिळालेल्या निधीचा समाजोपयोगी उपक्रमांसाठी प्रभावी वापर करण्याचा सिद्धिविनायक न्यासाचा प्रयत्न असून यादृष्टीने आगामी वर्षातील तरतूद केल्याची माहितीही विना पाटील यांनी दिली.

गेल्या वर्षाच्या तुलनेत उत्पन्नात वाढ झाली असून भाविकांचा वाढता भक्तीमय सहभाग यामुळे हे शक्य झाले आहे. विशेष म्हणजे, आशिर्वचन पूजा, देणग्या, दानपेटी तसेच अभिषेक यांसारख्या विविध माध्यमांतून उत्पन्नात वाढ झाल्याचे न्यास व्यवस्थापनाने म्हटले आहे.

गरीब व गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत देण्यासाठी सुमारे 36 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, तर शासकीय व निमशासकीय रुग्णालयांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 24 कोटी रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत.

डायलिसिस उपचारासाठी 2 कोटी 60 लाख रुपयांची मदत प्रस्तावित केली आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांसाठी ‌‘सिद्धिविनायक शिक्षणवृत्ती‌’ योजनेअंतर्गत 1 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी ‌‘पुस्तक पेढी‌’ योजनेसाठी सुमारे2 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, या योजनेत यंदा तब्बल 40 लाखांची वाढकेली आहे.

श्रीसिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना

राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये 8 मार्च रोजी महिला दिनी जन्मलेल्या नवजात बालिकांच्या सर्वांगीण विकासासाठी या योजनेला मान्यता देण्यात आली असून, प्रत्येक बालिकेच्या नावाने 10 हजार रुपयांची मुदत ठेव करण्यात येणार आहे. तसेच सामाजिक संवेदनशीलतेच्या दृष्टीने ‌‘श्रीसिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना‌’ विशेष ठरणार आहे. मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक आधार निर्माण करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT