Shivshastra Shauryagatha Exhibition pudhari photo
मुंबई

Shivshastra Shauryagatha Exhibition : मुंबईत शिवशस्त्र शौर्यगाथेचा ऐतिहासिक ठेवा!

'शिवशस्त्र शौर्यगाथा' प्रदर्शनाचे उद्घाटन, पुढील सहा महिने प्रदर्शन सर्वांसाठी असणार खुले

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वाघनखे, सेनासाहेब सुभा रघुजीराजे भोसले यांची तलवार यांसारखी ऐतिहासिक शस्त्रे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करून, सर्व नियम आणि प्रक्रियांचे पालन करत महाराष्ट्रात परत आणणे हे आमचे कर्तव्यच होते. शिवकालीन शस्त्रांचे जतन आणि संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे 'शिवशस्त्र शौर्यगाथा' प्रदर्शनाला भेट देऊन हा जाज्वल्य इतिहास समजून घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी केले.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात आयोजित 'शिवशस्त्र शौर्यगाथा' या विशेष प्रदर्शनाचे उद्घाटन मंत्री शेलार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी सचिव किरण कुलकर्णी, वस्तुसंग्रहालयाचे महासंचालक सभ्यासाची मुखर्जी, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक तेजस गर्गे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

यावेळी 'दांडपट्टा' या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले. शस्त्रे ही केवळ पराक्रमाची प्रतीके नसून ती धैर्य, अभियांत्रिकी कौशल्य, धातुशास्त्र आणि अचूक नियोजनाचे दर्शन घडवतात. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे हे नियोजनबद्ध विजयाचे प्रतीक असल्याचे मंत्री शेलार यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने आंतरराष्ट्रीय नियम, प्रथा व संकेतांचे पालन करून हा ऐतिहासिक ठेवा महाराष्ट्रात परत आणला आहे. तर, योग्य समन्वयातून सेनासाहेब सुभा रघुजीराजे भोसले यांची तलवार मराठी माणसाच्या मालकीची म्हणून सन्मानाने परत आणण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

प्रदर्शनात या शिवकालीन शस्त्रांचा समावेश

या प्रदर्शनात छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे, रघुजीराजे भोसले यांची तलवार, सरसेनापती प्रतापराव गुजर यांची तलवार, खंडेराव गायकवाड यांची ढाल, सरदार रास्ते यांचा दांडपट्टा यांसह शिवकालीन आणि समकालीन अनेक ऐतिहासिक शस्त्रे पाहण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. हे प्रदर्शन पुढील सहा महिने सर्वांसाठी खुले राहणार असून, मराठी बांधवांसह इतिहासप्रेमी आणि देशभक्त नागरिकांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन मंत्री शेलार यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT