मुंबई : शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येणार असल्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये एमआयएमला मिळणारे स्वीकृत नगरसेवक पद गमवावे लागणार आहे, तर दुसरीकडे शिवसेनेच्या वाट्याला दोन स्वीकृत नगरसेवक पदे येणार आहेत.
मुंबई महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकांची संख्या पाचवरून आता दहा झाली आहे. विविध पक्षांच्या निवडून आलेल्या नगरसेवकांच्या संख्येनुसार स्वीकृत नगरसेवकांची पदे त्या त्या पक्षाच्या वाट्याला येणार आहेत. सर्वाधिक नगरसेवक असलेल्या भाजपाला चार स्वीकृत नगरसेवक मिळणार असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला तीन स्वीकृत नगरसेवक मिळणार आहेत.
काँग्रेस शिवसेना व एमआयएमला प्रत्येकी एक एक स्वीकृत नगरसेवक मिळणार होते. परंतु शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येणार असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या एकमेव नगरसेवकानेही शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकांचे संख्याबळ 33 होणार आहे. ही संख्या लक्षात घेता शिवसेनेच्या वाट्याला दोन स्वीकृत नगरसेवक येणार आहेत. त्यामुळे आठ नगरसेवक असलेल्या एमआयएमला आपले स्वीकृत नगरसेवक पद गमवावे लागणार आहे.
शिवसेनेच्या स्वीकृत नगरसेवकांची संख्या वाढल्यामुळे मागच्या दारातून नगरसेवकपदी बसण्यासाठी शिवसेनेतील अनेक इच्छुक निर्माण झाले आहेत. यात काही माजी नगरसेवकांचाही समावेश आहे. दरम्यान एक स्वीकृत नगरसेवकपद आपल्याला मिळावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेकडे आग्रह धरला आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचे बंधू कप्तान मलिक यांच्यासाठी स्वीकृत नगरसेवकपदाचा आग्रह धरण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिवसेना आता काय निर्णय घेणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
स्वीकृत नगरसेवक पदासाठी ही नावे चर्चेत
भाजप : रवी राजा, भालचंद्र शिरसाट, डॉ. शुभा राऊळ, संतोष धुरी, उज्वला मोडक, विनोद मिश्रा
शिवसेना : राजूल पटेल, राजू पेडणेकर, यशवंत जाधव, कप्तान मलिक