मुंबई: राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडवत, ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते आता राज्यपालांच्या भेटीनंतर थेट राष्ट्रपतींची भेट घेण्याच्या तयारीत आहेत. विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.
काल शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार आणि नेत्यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी महायुती सरकारमधील वादग्रस्त आणि कलंकित मंत्र्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली. मंत्र्यांच्या बेजबाबदार वर्तनामुळे लोकशाहीला धोका निर्माण झाला असल्याचा आरोप करत, संबंधित मंत्र्यांविरोधातील पुरावे, कागदपत्रे आणि पेनड्राईव्ह थेट राज्यपालांकडे सादर करण्यात आले. मंत्री संजय शिरसाट आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात आली.
राज्यपालांकडून या मागण्यांवर कारवाई होते का?, याकडे ठाकरे गट लक्ष ठेवून आहे. मात्र, या प्रकरणाची दखल घेत, आता ठाकरे गटाच्या नेत्यांनी राष्ट्रपतींकडेही वेळ मागितली आहे. पुढील आठवड्यात राष्ट्रपतींची भेट होण्याची शक्यता असून, या भेटीत अंबादास दानवे यांच्यासह ठाकरे गटाचे आमदार आणि काही खासदार दिल्लीला जाणार आहेत. या भेटीतही मंत्र्यांविरोधातील पुरावे आणि तक्रारी राष्ट्रपतींना सादर करून, केंद्र सरकारकडून हस्तक्षेपाची मागणी केली जाणार आहे.
या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हं आहेत. ठाकरे गटाच्या या आक्रमक भूमिकेमुळे सत्ताधारी महायुती सरकारवर दबाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यपाल आणि राष्ट्रपती या दोन्ही पातळ्यांवर तक्रारी सादर करून, ठाकरे गटाने आपली लढाई अधिक तीव्र केली आहे. आता या मागण्यांवर सरकार आणि केंद्र काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.