मुंबई: महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेत (शिंदे गट) अंतर्गत मतभेद उफाळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट आणि आमदार बच्चू कडू यांनी कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी)चे संस्थापक अभिजित दीपके यांची स्वतंत्रपणे भेट घेतल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.
महायुतीतील समन्वय आणि राजकीय भूमिका ठरविण्यापूर्वी अशा प्रकारे दीपके यांची भेट घेण्याची गरज काय होती, असा सवाल शिंदे यांनी शिरसाट आणि कडू यांना केल्याचे वृत्त आहे.
महायुतीतील घटक पक्ष म्हणून संवेदनशील राजकीय घडामोडींमध्ये समन्वय राखणे आवश्यक असताना स्वतंत्र भूमिका घेणे योग्य नसल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केल्याची चर्चा आहे. शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर येथे दीपके यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
त्यानंतर दीपके गावी परतल्यानंतर आमदार कडू यांनीही त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. या सलग भेटींमुळे राजकीय चर्चांना अधिक उधाण आले. महायुतीच्या भूमिकेपासून वेगळा संदेश गेल्याची भावना पक्षात निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.
शिरसाट, कडू यांनी स्पष्टीकरण द्यावे : प्रवीण दरेकर
दरम्यान, भाजप नेते प्रवीण दरेकर यांनीही या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. विरोधी पक्ष विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर राजकीय पोळी भाजत आहेत, हे समजू शकतो. मात्र, महायुती सरकारमध्ये सहभागी असलेले शिरसाट आणि कडू यांच्यासारखे नेते जर अभिजित दीपके यांच्या घरी जाऊन भेट घेत असतील, तर त्यातून जनतेमध्ये चुकीचा संदेश जातो, असे दरेकर म्हणाले.
ज्या आंदोलनातून केंद्र सरकारची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न झाला, त्याच आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीची भेट घेणे हे महायुतीच्या भूमिकेशी सुसंगत नाही. त्यामुळे शिरसाट आणि कडू यांनी आपल्या भूमिकेबाबत जनतेसमोर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी दरेकर यांनी केली.