मुंबई: राज्यातील गरीब आणि कामगारांसाठी सुरू केलेली शिवभोजन थाळी योजना सध्या मोठ्या आर्थिक अडचणीत सापडली आहे. राज्य शासनाने शिवभोजन केंद्र चालकांची करोडो रुपयांची बिलं थकवली असून, गेल्या सात महिन्यांपासून पैसे दिलेले नाहीत. विशेष म्हणजे, १५ फेब्रुवारी २०२५ पासून आतापर्यंत केंद्र चालकांना एकही बिलाचा पैसा मिळालेला नाही.
राज्यात सध्या १८८४ शिवभोजन केंद्रे कार्यरत आहेत. थकीत अनुदानामुळे १५ केंद्रे बंद पडली आहेत आणि इतर केंद्रे देखील बंद होण्याच्या मार्गावर आहेत. केंद्र चालकांनी आंदोलनाचा इशारा दिला असून, थकीत पैसे त्वरित न दिल्यास सर्व केंद्रे बंद करण्याचा इशारा दिला आहे. या गंभीर परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी (दि.१९) केंद्र चालक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहेत.
शिवभोजन थाळी योजना ही गरीब मजूर, कामगारांसाठी अवघ्या १० रुपयांत सुरू करण्यात आली होती. मात्र, शासनाच्या दुर्लक्षामुळे या योजनेचा बोजवारा उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लाडकी बहीण योजनेमुळे शिवभोजन थाळी आणि आनंदाचा शिधा योजना देखील अडचणीत आल्या आहेत. राज्य शासनाने तातडीने थकीत अनुदान दिले नाही, तर लाखो गरीब आणि कामगारांच्या पोटाची चिंता वाढणार आहे. केंद्र चालकांच्या आंदोलनामुळे शासनावर दबाव वाढला असून, पुढील काही दिवसांत या योजनेचे भवितव्य ठरणार आहे.