मुंबई: सुमारे 75 लाख रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी विश्वनाथ लक्ष्मण मिस्त्री या आरोपीविरुद्ध भायखळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शेअर ट्रेडिंगद्वारे चांगल्या परताव्याच्या आमिषाने एका बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची फसवणूक केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच विश्वनाथ पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
यातील तक्रारदार वडाळा परिसरात राहत असून सध्या एका नामांकित बँकेत वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून काम करतात. चार वर्षांपूर्वी त्यांच्या एका मित्राने त्यांची ओळख विश्वनाथशी करून दिली होती. तो शेअर ट्रेडिंगमध्ये अनेकांना गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करून त्यांना चांगला परतावा देत असल्याचे सांगितले होते.
त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे गुंतवणूक करावी, असा सल्ला त्यांच्या मित्राने त्यांना दिला होता. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. काही दिवसांनी त्यांची विश्वनाथशी पुन्हा भेट झाली. या भेटीदरम्यान त्याने त्यांना शेअर गुंतवणुकीवर चार टक्के परतावा देण्याचे आमिष दाखविले.
भविष्यात ही रक्कम त्यांच्या कामी येईल असे सांगून त्याने त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयतन केला. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी आधी वीस लाख व नंतर 55 लाख रुपये असे 75 लाखांची शेअरमध्ये गुंतवणूक केली. या गुंतवणुकीवर त्यांना त्याने नऊ लाख दहा हजार रुपयांचा परतावा दिला. मात्र नंतर त्याने परताव्याची रक्कम देणे बंद केले.
याच दरम्यान त्यांना विश्वनाथने अशाच प्रकारे अनेकांना शेअरमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करून त्यांना काही महिने चांगला परतावा दिला. नंतर त्यांना परताव्याची रक्कम देणे बंद केले होते. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी त्याच्याविरुद्ध भायखळा पोलीस ठाण्यात तक्रार केली. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर विश्वनाथ मिस्त्रीविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
तपासादरम्यान विश्वनाथ हा त्याच्या कुटुंबियांसोबत पळून गेला असून त्याच्या घराला टाळे लागले आहे. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. शेअर गुंतवणुकीच्या बहाण्याने विश्वनाथने अनेकांना गंडा घातल्याचे तपासात उघडकीस आले असून फसवणुकीचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.