मुंबई: शेअर गुंतवणुकीच्या बहाण्याने एका बँक अधिकाऱ्याला सायबर ठगाने तब्बल 97 लाखांना गंडा घातला. याप्रकरणी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून पूर्व सायबर सेल पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाचा शोध सुरु केला आहे.
यातील तक्रारदार एका खासगी बँकेत वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करतात. काही दिवसांपूर्वी त्यांना मोबाईलवर एक लिंक आली. ही लिंक ओपन केल्यानंतर त्यांना एका खासगी कंपनीच्या शेअरमार्केटसंबंधित व्हॉटअप ग्रुपमध्ये जोडण्यात आले.
या ग्रुपमध्ये अनेक सभासदांनी शेअरमध्ये गुंतवणूक केल्याचे तसेच त्यांना चांगला परतावा मिळाल्याचे दिसत होते. त्यामुळे त्यांनी सुरुवातीला शेअरमध्ये पन्नास हजारांची गुंतवणूक केली. त्यात त्यांना पाच टक्के फायदा झाला.
त्यामुळे त्यांनी टप्याटप्याने विविध शेअरमध्ये 97 लाखांची गुंतवणूक केली. या गुंतवणुकीवर त्यांना प्रचंड फायदा झाला होता, मात्र ही रक्कम त्यांना त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करता येत नव्हती. याबाबत त्यांनी ग्रुप ॲडमिनला वारंवार विनंती केली, मात्र त्यांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही. रक्कम त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यासाठी त्यांच्याकडून त्यांच्याकडे पैशांची मागणी केली जात होती.
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी पूर्व सायबर सेल पोलिसांत अज्ञात सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर संबंधित सायबर ठगाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा सायबर सेल पोलिसांकडून तपास सुरु आहे. प्राथमिक तपासात ही रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या बँक खात्यांसह खातेदारांची पोलिसांकडून माहिती काढली जात आहे.