Sharad Pawar Pudhari
मुंबई

Sharad Pawar: शरद पवारांना भाजपसोबत जाण्यापासून रोखण्याची काँग्रेसची रणनीती

परिसीमन विधेयकाला पाठिंबा दिला तरी राष्ट्रवादी इंडिया आघाडीत राहील, असे राहुल गांधींचे विधान; पक्षाच्या काही ज्येष्ठ नेत्यांच्या शपथविधीची राजकीय वर्तुळात चर्चा.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: परिसीमन विधेयकानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील ‘एनडीए’ला पाठिंबा दिल्यानंतर सत्तेपासून दूर का राहायचे, असा शरद पवार राष्ट्रवादीतील काही ज्‍येष्ठ नेत्यांचा सूर आहे. लवकरच यातील काही नेत्यांचा शपथविधी होणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

मात्र, ‘इंडिया’ आघाडीतील महत्त्‍वाचे नेते, काही राजकीय निरीक्षकांच्या मते, चाणक्य असलेले शरद पवार इंडिया आघाडीपासून दूर जाऊ नयेत म्हणून त्यांना रोखण्याची रणनीती काँग्रेसने आखली आहे.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या भावनेतून आज ‘परिसीमन विधेयकाला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने पाठिंबा दिला, तरी ते ‘इंडिया’ आघाडीचा भाग राहतील,’ असे जाहीर केले आहे. महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही अत्यंत सावध प्रतिक्रिया व्यक्त करत पुढे काय होईल त्याकडे लक्ष ठेवून आहोत, असे सूचित केले आहे.

शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपच्या सत्तेत सामील झाला तर तो विरोधी ऐक्याला बसलेला फटका ठरेल. तृणमूल काँग्रेसच्या पराभवापाठोपाठ आधी द्रमुक आणि आता शरद पवार राष्ट्रवादी यांची भूमिका बदलली आहे.

पक्षातील फुटीच्या भीतीने राष्ट्रवादीचा विधेयकाला पाठिंबा

पक्षातील खासदारांना भारतीय जनता पक्ष केव्हाही फोडू शकेल, या भीतीने परिसीमन विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय घ्यावा लागला, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासगीत सांगत असल्याचे समजते.

जर आपण समर्थन देत असू, तर मंत्रिपदे स्वीकाराला हरकत काय, असा सूर या पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांनी लावला आहे. या नेत्यांचा आग्रह गृहीत धरत महाराष्ट्रात हिवाळी अधिवेशनानंतर सरकारमध्ये जायचे, असे घाटते आहे.

सुनेत्रा व पार्थ पवार यांचा विरोध कोण ऐकणार?

केंद्रातही सुप्रिया सुळे मंत्री होतील, असे बोलले जाते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार यांचा या प्रस्तावाला विरोध असला, तरी भारतीय जनता पक्षासमोर त्यांचे काही चालणार नाही, असे मानले जात आहे.

जयंत पाटील, आव्हाड यांच्या मंत्रिपदाची आतापासूनच चर्चा

जयंत पाटील यांना अर्थ खाते दिले जाण्याची शक्यता काही महिन्यांपासून वर्तवली जाते आहे. जितेंद्र आव्हाड हे भारतीय जनता पक्षाच्या भूमिकांना विरोध करणारे आमदारही मंत्री होतील, असे मानले जाते आहे. लवकरच या घडामोडी घडतील, असे बोलले जात असतानाच राहुल गांधी यांनी पवारांनी विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला तरी ते ‘इंडिया’ आघाडीचे सदस्य असल्याचे स्पष्ट केले आहे.

शनिवारी सकाळपासून काँग्रेस आणि ठाकरे शिवसेनेचे नेते शरद पवार व सुप्रिया सुळे यांच्यावर आक्रमकपणे टीका करत असल्यामुळे ‘इंडिया’ आघाडी आणि महाराष्ट्रातील ‘मविआ’तून बाहेर पडणे राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोपे ठरले असते. विखारी टीका कशी सहन करायची, असा प्रश्न करीत भाजपकडे जाता येईल, असे काही नेते मानत होते.

राष्ट्रवादीचे ‘वेट अँड वॉच’

मात्र, रात्री अचानक राहुल गांधींची भूमिका लक्षात घेता आता विधेयकाला पाठिंबा देऊन सत्तासमावेशासाठी काही महिने जाऊ द्यायचे काय, असाही एक मतप्रवाह पक्षात चर्चेला आला आहे.

अदानी यांची दोन तास भेट!

उद्योगपती गौतम अदानी यांनी शनिवारी शरद पवार यांची भेट का घेतली, असा प्रश्न काँग्रेस नेते करीत आहेत. ही भेट सुमारे दोन तास चालली. या बैठकीत वेगवेगळ्या विषयांबरोबरच सरकारचा भाग होण्याच्या विषयावरही चर्चा झाली असल्याचे बोलले जाते. मात्र, या गोष्टींना दुजोरा मिळालेला नाही.

धर्मनिरपेक्ष विचारांवर निष्ठा ठेवणाऱ्या मंडळींची टीका लक्षात घेता लगेच सरकारमध्ये जायचे की वाट पाहायची, यावर लवकरच शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस निर्णय घेईल, असे समजते. प्रथमत: लोकसभेत विधेयक पारित होऊ दे मग पुढचे बघू, असे शरद पवार गटातील एका ज्येष्ठ नेत्याने ‘पुढारी’शी बोलताना स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT