Mumbai traffic jam Pudhari
मुंबई

Mumbai traffic jam: मुंबईची कोंडी; एकाच वेळी 4 पूल वाहतुकीस बंद! 15 मिनिटांचा प्रवास तासाभरावर

नागरिकांच्या मनस्तापात भर, चिंचोळ्या रस्त्यांवर वाहनांची प्रचंड गर्दी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: दक्षिण मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबईतील नागरिकांना सध्या प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. शहरात एकाच वेळी बहुतांश रस्त्यांची कामे, खोदकामे, पुलांची बांधकामे आणि काही पुलांवरील वाहतूक बंद असल्याने प्रशासनाच्या नियोजनाचे बारा वाजल्याचे चित्र नागरिकांच्या मनस्तापात भर टाकत आहे.

मुख्य पुलांची ही अवस्था असल्यामुळे वाहनचालक या परिसरांतील अंतर्गत रस्त्यांवरून प्रवास करत आहेत. त्यामुळे गल्लीबोळांपासून ते अगदी लहान रस्त्यांवरही वाहनांच्या रांगा पाहायला मिळत आहेत.

शीव अर्थात सायन आणि एल्फीन्स्टन मार्गावरील उड्डाणपूल बंद असल्याने या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. परळ टी-टी उड्डाण पुलाची एकच मार्गिका सुरू असल्यामुळे रुग्णालयांच्या या परिसरातसुद्धा वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. त्यातच नागरी वस्तीचा परिसर असल्यामुळे आणि चिंचोळ्या रस्त्यांमुळे वाहनांची प्रचंड गर्दी अगदी भर दुपारीसुद्धा इथे पाहायला मिळत आहे.

भायखळा, दादर रेल्वे स्थानकांवरही उड्डाणपुलांचे काम सुरू आहे. त्यामुळे या परिसरांमध्ये रस्त्यांवर एकीकडे बांधकाम साहित्याचे ढीग, उडणारी धूळमाती आणि सिमेंट यांमुळे नागरिकांचा श्वास गुदमरू लागला आहे.

कामाच्या वेळांमध्ये एकाच वेळी मोठ्या संख्येने शहरात बाहेर पडणाऱ्या वाहनांमुळे ज्या पुलांच्या मदतीने शहराच्या मध्य भागातील प्रवासासाठी 15 ते 20 मिनिटांचा वेळ लागत होता, तोच वेळ आता तासाभरावरही पोहोचत आहे. त्यामुळे या वाहतूक कोंडीची वेगळीच धास्ती नागरिकांना लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT