cyber fraud pudhari photo
मुंबई

Mumbai cyber fraud | फसवणुकीचा नवा फंडा : ओळखीच्या नावाने फोन करून लाखोंचा गंडा

‘सीरिज कॉल’ करून फसवणारी टोळी सक्रिय; विश्वास संपादन करत सायबर भामट्यांकडून आर्थिक लूट

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : महेश पांचाळ

मी अमुक व्यक्ती बोलतोय... अडचणीत आहे. तातडीने पैसे पाठव. किंवा माझ्या खात्यात काही अडचण आहे, तू आधी पैसे पाठव, नंतर देतो, असा फोन किंवा व्हॉटस् ॲप मेसेज आला तर सावध व्हा. ओळखीच्या व्यक्तीचे नाव, फोटो, व्यवसाय आणि पदाची माहिती वापरून त्यांच्या परिचितांकडे पैसे मागण्याचे प्रकार वाढत आहेत. एकाच व्यक्तीची ओळख वापरून तिच्या संपर्कातील अनेकांना एकामागोमाग फोन केले जात असल्याने ‘सीरिज कॉल’ फसवणुकीचा नवा प्रकार समोर येत आहे.

सायबर भामटे सर्वप्रथम सोशल मीडिया, व्हॉटस् ॲप किंवा अन्य ऑनलाईन माध्यमांतून एखाद्या व्यक्तीची माहिती मिळवतात. त्यानंतर त्याच नावाने बनावट मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सॲप खाते तयार केले जाते. संबंधित व्यक्तीचा फोटो डीपीला लावल्याने समोरच्याचा विश्वास पटकन बसतो. त्यानंतर मोबाईल हरवला आहे, नंबर बदलला आहे, अचानक पैशांची गरज आहे, रुग्णालयात पैसे भरायचे आहेत... अशी कारणे सांगून तातडीने पैसे पाठविण्याची मागणी केली जाते.

फोन खरा की बनावट?

  • ओळखीचे नाव आणि फोटो दिसला म्हणून फोन खरा मानू नका.

  • पैसे मागितल्यास त्या व्यक्तीच्या जुन्या मोबाईल क्रमांकावर फोन करून खात्री करा.

  • फोनवरून आलेल्या खात्यात पैसे पाठवण्यापूर्वी खातेधारकाचे नाव तपासा.

  • ओटीपी, यूपीआय पिन, पासवर्ड किंवा बँक तपशील कोणालाही देऊ नका.

  • अनोळखी लिंकवर क्लिक करू नका.

फसवणूक झाल्यास काय कराल?

  • लगेच १९३० वर संपर्क करा. फसवणुकीची तातडीने माहिती द्या. बँकेला कळवा.

  • फसवणुकीच्या व्यवहाराची माहिती देऊन रक्कम थांबविण्याची विनंती करा.

  • पुरावे जतन करा. फोन नंबर, व्हॉटस् ॲप चॅट, स्क्रीनशॉट, बँक व्यवहार आणि लिंक डिलीट करू नका.

  • फसवणुकीनंतर सुरुवातीची काही मिनिटे महत्त्वाची ठरू शकतात.

‘सीरिज कॉल’ फसवणूक नेमकी कशी होते?

  • माहिती मिळवणे : सोशल मीडिया, व्हॉटस् ॲप किंवा अन्य माध्यमांतून व्यक्तीची माहिती गोळा केली जाते.

  • बनावट खाते तयार : नाव आणि फोटो वापरून दुसऱ्या क्रमांकावर व्हॉटस् ॲप खाते तयार केले जाते.

  • विश्वास संपादन : 'मोबाईल हरवला', 'नंबर बदलला' अशी कारणे सांगून संपर्क केला जातो.

  • तातडीची गरज सांगणे : रुग्णालय, व्यवसाय, बँक किंवा अन्य कारण पुढे करून पैसे मागितले जातात.

  • एकाच नावाने अनेकांना लक्ष्य : मित्र, नातेवाईक, सहकारी अशा अनेकांना एकामागोमाग फोन केला जातो.

  • रक्कम वेगवेगळ्या खात्यांत वळवणे : पैसे मिळताच ते पुढील खात्यांमध्ये वळवतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT