Sejal Pawar Controversy: मुंबईतील केईएम रुग्णालय आणि सेठ जी. एस. मेडिकल कॉलेजशी संबंधित अंतिम वर्षाची एमबीबीएस विद्यार्थिनी सेजल पवार हिच्यावर रुग्णालय प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमधील वादग्रस्त वक्तव्यानंतर तिला 15 दिवसांची सक्तीची रजा देण्यात आली असून या कालावधीत रुग्णालय, मेडिकल कॉलेज आणि हॉस्टेल परिसरात प्रवेश करण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरेच्या कार्यक्रमातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये सेजल पवारने स्वतःची ओळख अंतिम वर्षाची एमबीबीएस विद्यार्थिनी म्हणून करून दिली होती. त्यावेळी तिने शरीरदान केलेल्या मृतदेहांवर (कॅडेव्हर) अभ्यास करताना काही विद्यार्थी पुरुष मृतदेहांच्या खासगी अवयवांबाबत चर्चा करत आणि त्यांची खिल्ली उडवत असत, असे वक्तव्य केले होते.
हे वक्तव्य समोर आल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ, विद्यार्थी आणि सोशल मीडिया युजर्सनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शरीरदान करणाऱ्या व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांचा हा अपमान असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. तसेच अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे भविष्यात शरीरदानाबाबत समाजात नकारात्मक मेसेज जाऊ शकतो, अशीही चिंता व्यक्त करण्यात आली.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत केईएम रुग्णालय प्रशासनाने प्राथमिक चौकशी सुरू केली. चौकशीत व्हिडिओतील व्यक्ती सेजल पवार असल्याचे स्पष्ट झाले. तसेच तिची वक्तव्ये प्रथमदर्शनी अयोग्य आणि वैद्यकीय व्यवसायाच्या मूल्यांना धरून नसल्याचे आढळून आले.
त्यानंतर प्रशासनाने तिला 15 दिवसांची सक्तीची रजा देण्याचा निर्णय घेतला. या कालावधीत तिला रुग्णालय, मेडिकल कॉलेज आणि हॉस्टेलमध्ये प्रवेश करता येणार नाही. याशिवाय संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून ही समिती सात दिवसांत आपला अहवाल सादर करणार आहे.
दरम्यान, वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालय प्रशासनाने सेजल पवारच्या मानसिक आरोग्याबाबतही चिंता व्यक्त केली आहे. सोशल मीडियावरील टीका आणि सार्वजनिक दबावामुळे तिच्यावर मानसिक ताण येऊ नये म्हणून समुपदेशन घेण्याचा सल्ला तिला देण्यात आला आहे.
या प्रकरणानंतर सेजल पवारचे पालकही रुग्णालय प्रशासनासमोर हजर झाले. त्यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. सूत्रांच्या माहितीनुसार, मुलीच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल खेद व्यक्त करताना ते भावूक झाले होते.
यापूर्वी केईएमचे अधिष्ठाता डॉ. हरीश पाठक यांनीही या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सांगितले होते. समितीने संपूर्ण व्हिडिओ पाहून आणि विद्यार्थिनीशी चर्चा करून काही वक्तव्ये आक्षेपार्ह, असंवेदनशील आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांकडून अपेक्षित असलेल्या व्यावसायिक मूल्यांच्या विरोधात असल्याचे नमूद केले होते.
सेजल पवारनेही लेखी स्वरूपात माफी मागितली असून तिच्या काही वक्तव्यांमुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, याची कबुली दिली आहे. या घटनेमुळे वैद्यकीय शिक्षणातील नैतिकता, शरीरदानाबद्दलचा आदर आणि डॉक्टरांकडून अपेक्षित असलेली संवेदनशीलता याबाबत पुन्हा एकदा व्यापक चर्चा सुरू झाली आहे.