मुंबई : संचमान्यतेच्या 15 मार्च 2024 च्या शासन निर्णयानुसार इयत्ता नववी व दहावीच्या वर्गासाठी किमान 20 विद्यार्थ्यांची अट ठेवण्यात आली आहे. राज्यातील जवळपास 18 हजार शाळांमध्ये या वर्गांमधील विद्यार्थ्यांची संख्या 20 पेक्षा कमी आहे. शिक्षण संचालकांच्या आदेशानुसार 5 डिसेंबरपर्यंत शिक्षक समायोजन प्रक्रिया राबविल्यास ऐन परीक्षांच्या कालावधीत या 18 हजार शाळांमधील इयत्ता नववी व दहावीच्या वर्गातील शिक्षकांची संख्या शून्य होणार आहे.
राज्यात प्राथमिक ते माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांचा अभाव असल्याने अध्यापनाचा मूलभूत ढाचा विस्कळीत झाला आहे.शिक्षकांच्या कमतरतेमुळे गुणवत्तेवर परिणाम होत असल्याची टीका सर्वच स्तरातून होत आहे. त्यातच शिक्षण विभागाच्या 15 मार्च 2024 च्या संचमान्यतेच्या शासन निर्णयानुसार इयत्ता नववी व दहावीच्या वर्गासाठी किमान 20 विद्यार्थ्यांची अट ठेवली आहे. वास्तविक इयत्ता नववी दहावीला समाजशास्त्रासाठी एक, भाषांसाठी एक व गणित व विज्ञान या विषयांसाठी एक असे तीन शिक्षक दिले जात होते. मात्र नव्या शासन निर्णयानुसार इयत्ता नववी व दहावीच्या प्रत्येक वर्गात 20 विद्यार्थी असल्यास एक शिक्षक देण्याची तरतूद केली आहे. त्यामुळे नव्याने करण्यात येणाऱ्या संचमान्यतेनुसार राज्यातील अनेक शाळांमधील शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. या अतिरिक्त शिक्षकांचे 5 डिसेंबरपर्यंत जिल्हास्तरावर समायोजन करण्याचे आदेश शिक्षण संचालकांनी राज्यातील सर्व जिल्ह्यातील शिक्षण अधिकाऱ्यांना दिले आहेत.
5 डिसेंबरनंतर विभाग स्तरावर आणि त्यानंतर 20 डिसेंबरपर्यंत राज्य स्तरावर समायोजन करण्यात येणार आहे. या समायोजन प्रक्रियेमुळे राज्यातील जवळपास 18 हजार शाळांमध्ये शिक्षक संख्या शून्य होण्याची शक्यता आहे. दहावीच्या परीक्षा फेब्रुवारीमध्ये होणार आहेत. त्यामुळे या संयोजनामुळे विद्यार्थ्यांच्या उजळणीच्या कालावधीतच शाळांमधील शिक्षकसंख्या शून्य झाल्यास या शाळांमधील विद्यार्थ्यांना शिकवणार कोण? त्यांचा अभ्यासक्रम कसा पूर्ण होणार? त्यांच्या तोंडी व विज्ञान प्रात्यक्षिक परीक्षा कोण घेणार? असा प्रश्न निर्माण होणार झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. दहावीच्या परीक्षा तोंडावर आल्या असून शिक्षण विभाग अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया राबवून मराठी माध्यमाच्या शाळांसह अन्य भाषिक शाळा बंद पाडण्याचा घाट शिक्षण विभागाकडून घालण्यात येत आहे. या शाळांना वाचविण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी 20 पेक्षा कमी विद्यार्थीसंख्या असलेल्या शाळांना तीन विषय शिक्षक देण्यात यावेत, अशी मागणी मुंबई मुख्याध्यापक संघटना उत्तर विभाग अध्यक्ष व भाजपाचे प्रदेश कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य अनिल बोरनारे यांनी केली आहे.