School Bus Pudhari
मुंबई

School Bus CCTV: सीसीटीव्ही नसलेल्या स्कूल बसवर कठोर कारवाई; मंत्री शंभूराज देसाई यांचा विधान परिषदेत इशारा

बदलापूर विनयभंग प्रकरणाचे तीव्र पडसाद; शालेय बस सुरक्षानियमांची संयुक्त तपासणी करण्याचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुलांना शाळेत नेणाऱ्या बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, मदतनीस व सुरक्षेचे निकष अनिवार्य केले आहेत. मात्र, या नियमांची अंमलबजावणी होते की नाही यासाठी पोलीस आणि वाहतूक पोलीस यांना संयुक्त तपासणी करण्याचे निर्देश देण्यात येतील. या नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांवर तसेच संबंधित संस्थांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिला.

राज्याला हादरवून टाकणाऱ्या बदलापुरात पुन्हा एकदा अल्पवयीन शालेय मुलींचा विनयभंग झाल्याचा प्रकार समोर आला. विधान परिषदेत या घटनेचे शुक्रवारी संतप्त तीव्र पडसाद उमटले. विधान परिषदेत शिवसेना (ठाकरे) आमदार सचिन अहिर यांनी याबाबत स्थगन प्रस्ताव मांडला. सरकारने शालेय स्कूल बससाठी नियमावली जाहीर केली. परंतु, अल्पवयीन शालेय मुलांचे शोषण होण्याचे प्रकार कमी झालेले नाहीत. सरकारने यावर कोणत्या उपाययोजना केल्या, याची माहिती सभागृहाला द्यावी. तसेच या गंभीर मुद्द्यावर चर्चा करावी, अशी मागणी अहिर यांनी केली. त्यांच्या मागणीनंतर महाविकास आघाडीच्या आमदारांनी आक्रमक भूमिका घेत सरकारला धारेवर धरले. हा विषय अत्यंत गंभीर आहे. बदलापुरात पुन्हा अशी घटना घडली आहे. बदलापुरातच असे प्रकार सातत्याने का घडतात? यापूर्वीच्या घटनेतून सरकारने बोध घेतला नाही का, असा संतप्त सवाल करत यापूर्वीच्या प्रकरणात शाळेचे संस्थापक दोषी आढळून आले. त्यावर कारवाई करण्याऐवजी स्वीकृत नगरसेवक केले.

ही बाब अत्यंत दुर्दैवी होती. सरकारचा धाक नसल्याने असे प्रकार वाढीस लागले आहेत, असा आरोप विरोधकांनी केला. या मुद्द्यावर अल्पकालीन चर्चा घडवून आणावी, अशी मागणी करताना चर्चेसाठी विरोधकांनी सभागृहात जोरदार हंगामा केला. दरम्यान, या विषयाची दखल घेऊन चर्चेसाठी तातडीने लक्षवेधी सूचना द्यावी, ती प्राधान्याने स्वीकारून चर्चेसाठी आणली जाईल, असे आश्वासन सभापती राम शिंदे यांनी देताच वादावर पडदा पडला.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत सरकार गंभीर

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत सरकार गंभीर आहे, असे सांगत शाळा बससंदर्भातील नियमावलीची कठोर अंमलबजावणी केली जाईल, अशी ग्वाही मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. शाळेच्या बसेससाठी यापूर्वीच सविस्तर एसओपी तयार करून पोलीस व परिवहन विभागाला अंमलबजावणीचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, याबाबत पुन्हा विशेष ड्राईव्ह घेण्याबाबत निर्देश दिले जातील, असे मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले. या दरम्यान दोषी वाहन चालक आणि मालकांवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT