मुंबई: ‘सत्यमेव जयते फार्मर कप २०२६’ ही महाराष्ट्रातील शेती परिवर्तनाची व्यापक जनचळवळ आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आत्मविश्वास हेच त्याचे सर्वात मोठे यश आहे. आजचे १८ हजार शेतकरी गट पुढील काळात ५० लाख शेतकऱ्यांना एकत्र आणतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
वर्षा निवासस्थानी पाणी फाऊंडेशनच्या सहकार्याने आयोजित ‘फार्मर कप २०२६’च्या शुभारंभ कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
यावेळी स्मार्ट शेती ॲपचे लोकार्पण करण्यात आले. मागील वर्षीच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या गटांमध्ये सोयाबीन, कापूस आणि मका या पिकांच्या उत्पादनात सरासरी ७१ टक्क्यांनी वाढ झाली.
सामूहिक खरेदीमुळे कृषी निविष्ठांवर १ हजार ५८४ कोटी रुपयांची बचत झाली, तर सामूहिक श्रमांमुळे एकरी सुमारे ६ हजार रुपयांची मजुरीची बचत झाली. गटशेतीमुळे उत्पादन खर्च कमी होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मोठी मदत होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
यावर्षी अल निनोमुळे पर्जन्यमान कमी राहण्याची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी जलसंधारणाच्या सर्व संरचनांची तातडीने दुरुस्ती, गाळ काढणे आणि पाणीसाठा वाढविण्याची कामे हाती घ्यावीत, असेही ते म्हणाले.
विकसित भारतासाठी शेतकऱ्यांच्या उन्नतीवर भर : आमिर खान
विकसित भारतासाठी शेतकरी सक्षम होणे आवश्यक आहे. राज्यभरात मुख्यमंत्री फडणवीस आणि या उपक्रमाच्या उच्चस्तरीय समितीतील सर्व सदस्यांनी केलेल्या नेतृत्वाचे कौतुक करत पाणी फाऊंडेशनचे संस्थापक आमिर खान यांनी सर्वांचे आभार मानले.
पाणी अडवा, पाणी जिरवा या कामांतर्गत गावांमधील जलसंधारणाची कामे गतीने करावीत आणि अपूर्ण कामे पुढील १५ दिवसांत पूर्ण करण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.