Language Policy: दोन भारतीय भाषा शिकणे बंधनकारक; दहावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा

सीबीएसईकडून त्रिभाषा धोरणासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर
Language Policy
Language PolicyPudhari
Published on
Updated on

मुंबई: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई)च्या विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकणे बंधनकारक असणार असून, त्यापैकी किमान दोन भाषा भारतीय असणे आवश्यक राहणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) २०२० अंतर्गत त्रिभाषा धोरणाच्या अंमलबजावणीसाठी ही नव्याने मार्गदर्शक तत्त्वे ‘सीबीएसई’ने जाहीर केली आहेत.

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून या धोरणाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येणार असून, सध्या दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा शिकण्याची किंवा तिची बोर्ड परीक्षा देण्याची गरज नसल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Language Policy
Special Train: पश्चिम रेल्वेकडून वलसाड-वेलंकन्नी-डहाणू रोड विशेष रेल्वेगाडी

सीबीएसईच्या परिपत्रकानुसार, विद्यार्थ्यांमध्ये बहुभाषिक कौशल्य विकसित करणे, भारतीय भाषांचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच भाषाशिक्षण अधिक आनंददायी आणि अर्थपूर्ण बनविणे हा त्रिभाषा धोरणाचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना तीन भाषांचे अध्ययन करावे लागणार असले तरी त्यापैकी किमान दोन भाषा भारतीय असणे अनिवार्य राहणार आहे.

२०२६-२७ मध्ये नववीत असलेल्या विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागतील. दोन भारतीय भाषा शिकणारे विद्यार्थी तिसरी भाषा म्हणून आणखी एखादी भारतीय भाषा किंवा इंग्रजीसारखी परकीय भाषा निवडू शकतील. मात्र, एक भारतीय आणि एक परकीय भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा भारतीयच घ्यावी लागणार आहे.

Language Policy
New School Syllabus Book: शालेय अभ्यासक्रमात थोर व्यक्तींवर नवे पुस्तक; शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती

सध्या नववीत शिकत असलेल्या आणि आधीपासून दोन परकीय भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना एकदाच विशेष सवलत देण्यात आली आहे. अशा विद्यार्थ्यांना त्यांची विद्यमान भाषा व्यवस्था कायम ठेवता येईल; मात्र त्यासोबत एक अतिरिक्त भारतीय भाषा शिकावी लागेल. या विद्यार्थ्यांसाठी तिसऱ्या भाषेचे मूल्यमापन केवळ शाळास्तरावर होणार असून, दहावीमध्ये त्या भाषेची बोर्ड परीक्षा घेतली जाणार नाही.

सीबीएसईने स्पष्ट केले आहे की, त्रिभाषा धोरणाचा उद्देश विद्यार्थ्यांवर अतिरिक्त परीक्षेचा बोजा टाकणे नसून, भाषाशिक्षण अधिक उपयुक्त आणि समृद्ध करणे हा आहे. विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची पूर्ण काळजी घेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी सुसंगतपणे ही अंमलबजावणी केली जात आहे.

विशेष विद्यार्थ्यांना सूट

दिव्यांग विद्यार्थी, परदेशातील सीबीएसई शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच परदेशातून भारतात परतलेल्या विद्यार्थ्यांना भारतीय भाषा तिसरी भाषा म्हणून शिकण्यापासून सूट देण्यात आली आहे. तसेच पालकांच्या बदली किंवा स्थलांतरामुळे विद्यार्थ्यांना पूर्वी निवडलेली तिसरी भाषा कायम ठेवण्याची मुभा दिली जाणार आहे.

सातवी-आठवीतील विद्यार्थ्यांनाही सवलत

सध्या सातवी किंवा आठवीत असलेल्या आणि आधीपासून दोन परकीय भाषा शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनाही एक अतिरिक्त भारतीय भाषा शिकावी लागणार आहे. मात्र, या विद्यार्थ्यांनाही दहावीपर्यंत तिसऱ्या भाषेची बोर्ड परीक्षा द्यावी लागणार नाही. त्यांचे मूल्यमापन शाळास्तरावरच केले जाणार आहे.

सहावीपासून पूर्ण अंमलबजावणी

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये सहावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांपासून त्रिभाषा धोरणाची पूर्ण अंमलबजावणी होणार आहे. या विद्यार्थ्यांना तीन भाषांपैकी दोन भारतीय भाषा शिकणे बंधनकारक असेल. पुढे हे विद्यार्थी दहावीत पोहोचल्यानंतर तिसऱ्या भाषेची बोर्ड परीक्षा देणार आहेत.

कोणत्या भाषा असतील?

हिंदी, मराठी, संस्कृत, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, बंगाली, गुजराती, पंजाबी, ओडिया, आसामी यांसह २२ अनुसूचित भाषा भारतीय भाषांमध्ये समाविष्ट आहेत. इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश, अरबी परकीय भाषा म्हणून गणल्या जातील. या भाषांसाठीची पाठ्यपुस्तके राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news