मुंबई : शेअर बाजाराचे शिक्षण देण्याच्या नावाखाली गुंतवणूक सल्ला दिल्याप्रकरणी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) अवधूत साठे ट्रेडिंग ॲकॅडमी प्रायव्हेट लिमिटेड आणि कंपनीच्या मालकावर शेअर बाजारात व्यवहार करण्यास बंदी घातली आहे. बेकायदेशीर नफा कमावल्याबद्दल 546.16 कोटी रुपये जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.
साठे ॲकॅडमीकडून शिकलेल्या काही व्यक्तींनी याबाबत सेबीकडे तक्रार केली होती. त्यानुसार शिक्षणाच्या नावाखाली ठराविक शेअरमध्ये गुंतवणूक करण्यास अथवा शेअरची विक्री करण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यासाठी सशुल्क व्हॉट्सॲप खाते उघडले होते. या गुंतवणूक सल्ल्याद्वारे हमखास परताव्याची हमीदेखील गुंतवणूकदारांना दिली जात होती. सेबीने साठे अकॅडमीला शेअर गुंतवणुकीचा सल्ला देण्यास, त्यासंबंधीचे संशोधन विश्लेषण सुविधा देण्यासही मनाई केली आहे. याशिवाय शेअर बाजारात शेअर खरेदी करणे, त्याची विक्री करण्यास अथवा कोणत्याही पद्धतीचा व्यवहार करण्यास मनाई केली आहे. आदेशापासून तीन महिने असे व्यवहार करता येणार नाहीत.
अवधूत साठे यांनी एक योजना तयार करण्यात मध्यवर्ती भूमिका बजावली आहे. त्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांना विशिष्ट शेअरच्या व्यापारात सहभागी होण्यास भाग पाडले जात असे. गौरी अवधूत साठे कंपनीच्या दैनंदिन कामकाजात सहभागी होत्या. त्यांचा कोणत्याही गुंतवणूक सल्लागार किंवा संशोधन विश्लेषक सेवा प्रदान करण्यात सहभाग आढळला नसल्याचे सेबीने म्हटले आहे. संबंधित संस्थेने 25 जुलै 2015 ते 9 ऑक्टोबर 2025 या कालावधीत 601.4 कोटी रुपये शुल्कापोटी जमा केले आहेत. त्यांपैकी 546.2 कोटी रुपये बेकायदेशीर कृत्याशी संबंधित असल्याचे सेबीने म्हटले आहे. दरम्यान, अवधूत साठे प्रशिक्षण संस्थेने सेबीचे आरोप फेटाळले असून, आमची संस्था केवळ शेअर बाजाराचे प्रशिक्षण देत असल्याचे म्हटले आहे.